डासांपासून बचावाचा ऋतू म्हणजे पावसाळा!
उन्हाळ्यातील असह्य उकाडा व घामाने आंबलेल्या शरीराला दिलासा देणारा ऋतू म्हणून पावसाळा सर्वांनाच आवडतो. प्रचंड उत्साह व आनंदाचा ऋतू म्हणजे पावसाळा. त्यामुळे अबला-वृद्धांना पावसाचे खास आकर्षण असते.
असे असले तरीही आरोग्याची सर्वाधिक काळजी घेण्याचा ऋतूही पावसाळाच असतो. या ऋतूत पाण्यापासून होणा-या आजारांपासून बचावाची जशी आवश्यकता असते तशीच आवश्यकता असते ती डासांपासून बचावाची. पिण्याचे पाणी दूषित असल्यास डायरिया, टायफॉईड, कावीळ, मलेरिया, डेंग्यू तसेच ऍलर्जी यासारख्या आजारांची लागण होऊ शकते. तर सर्दी, खोकला व तापाची लागण होण्याचीही दाट शक्यता असते.
त्यामुळे पावसाळ्यात घरांच्या आसपासच्या परिसरात पाणी साचून राहणार नाही. तसेच परिसर स्वच्छ राहील याची काळजी घेण्याची खास आवश्यकता असते. रिकामे जुने डबे, टायर, नारळाच्या करवंट्या किंवा सांडपाण्याची डबके आदींवर कीटक नाशक औषधांची फवारणी करण्याची आवश्यकता असते. बाहेरचे व उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे पावसाळ्यात शक्यतोवर टाळावे, सलग संततधार पाऊस सुरू असल्यास नळांद्वारे येणारे पाणी गढूळ येण्याचीही दाट शक्यता असते. हे पाणी गाळून, उकळून तसेच निर्जंतुक करून पिणे कधीही उत्तम. आजार झाल्यानंतर डॉक्टरकडे जाऊन उपचार करून घेणे व औषधे घेण्यापेक्षा तो होऊ नये यासाठी काळजी घेणे कधीही श्रेयष्कर.