शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 3 मे 2021 (09:24 IST)

उन्हाळ्यात व्यायाम करताना...

आरोग्यदायी राहण्यासाठी योग्य दिनक्रम आणि संतुलित आहाराबरोबरच पुरेशी झोप आणि वर्कआउट करणे गरजेचे आहे. त्याचे पालन करणे सोपे नाही. विशेषतः उन्हाळ्यात तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. हलगर्जीपणा केल्यास स्ट्रोक, चक्कर, डोकेदुखी, डिहायड्रेशन, थकवा, हीट स्ट्रोक याचा फटका बसू शकतो. जर नियमित व्यायाम करत असाल तर उन्हाळ्यात याचा विचार करायला हवा.
 
उन्हाळ्यात सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत व्यायाम करण्याचे टाळावे. या काळात सूर्य डोक्यावर आलेला असतो, तापमान वाढलेले असते. म्हणूनच उन्हाळ्यात सकाळी व्यायाम करावा. वातावरण प्रदूषित असेल तर घरातच व्यायाम करण्याचा विचार करावा.
 
उन्हाळ्यात सैल आणि हलके कपड्यांचा पेहराव करुनच व्यायाम करायला हवा. फिट कपडे घालून व्यायाम केल्याने उष्णता वाढते. त्यामुळे व्यायाम करताना अडचणी येतात. म्हणूनच सुती कपड्यांचा पेहराव करावा. सुती कपडे घाम शोषून घेतात.
 
उन्हाळ्यात घराबाहेर जाताना सनस्क्रिन लावणे गरजेचे आहे. विशेषतःआउटडोर व्यायामाच्या वेळी सनस्क्रिनचा वापर करायला हवा. जर निष्काळजीपणा दाखवल्यास सनबर्नने त्वचेला इजा होण्याची शक्यता राहते.
 
उन्हाळ्यात व्यायाम करण्यापूर्वी दोन ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. त्यानंतर व्यायामादरम्यान पाणी प्राशन करावे. तहान भागवण्यासाठी पाण्याची बाटली सोबत असावी. व्यायामानंतरही पाणी पिण्यास विसरु नये.
डॉ. मनोज शिंगाडे