रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जुलै 2023 (08:44 IST)

World Hepatitis Day 2023 : जाणून घ्या प्रकार, लक्षणं, निदान आणि उपचार

हेपेटायटिस दिन : हेपेटायटिस म्हणजे सामान्य भाषेत यकृताला (Liver) सूज येणं. विषाणूमुळे होणारा संसर्ग किंवा मद्य सेवनामुळे यकृत खराब झाल्याने हेपेटायटिस होण्याची शक्यता असते.
 
लोकांमध्ये हेपेटायटिसबाबत जनजागृतीसाठी 28 जुलै 'हेपेटायटिस दिन' म्हणून साजरा केला जातो. 
 
हेपेटायटिसचे A,B,C,D आणि E असे पाच प्रकार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, भारतात हेपेटायटिस 'B' चे सर्वाधिक 40 दशलक्ष रुग्ण आहेत. तर, जगभरात ही संख्या 240 दशलक्ष असल्याची माहिती आहे. 
 
हेपेटायटिसची लक्षणं अनेकवेळा दिसून येत नाहीत किंवा अत्यंत मोजकी लक्षणं दिसून येतात. याचे प्रकार कोणते? लक्षणं आणि निदान हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. 
 
हेपेटायटिस म्हणजे काय?   
हेपेटायटिस यकृताचा (Liver) आजार आहे. हा आजार प्रामुख्याने 'हेपेटायटिस व्हायरस' नावाने ओळखल्या जाणाऱ्या विषाणूंमुळे होतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार मद्यसेवन, विशिष्ट प्रकारची औषधे, कारखान्यात वापरले जाणारे काही द्रव पदार्थ आणि इतर आजारांमुळे हेपेटायटिस होण्याची दाट शक्यता असते. 
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात हेपेटायटिस B आणि C मुळे ग्रस्त लाखो रूग्ण आहेत. हेपेटायटिसचा संसर्ग झाल्यामुळे  'लिव्हर सेसॉसिस' आणि यकृताचा कॅन्सर होतो. आणि इतर कारणांमुळे मृत्यू देखील होतो.    
 
जगभरात 354 दशलक्ष लोक हेपेटायटिस B आणि C मुळे ग्रस्त आहेत. यापैकी अनेकांपर्यंत निदान आणि उपचार पोहोचू शकले नाहीत. केंद्र सरकारने 2030 पर्यंत विषाणूंमुळे होणारा हेपेटायटिस निर्मुलनाचं लक्ष ठेवलं आहे. 2018 पासून हेपेटायटिस B आणि C ग्रस्त रुग्णांना मोफत औषध देण्याची योजना मोदी सरकारने सुरू केली होती. व्हायरस हेपेटायटिस भारतात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी एक गंभीर समस्या मानली जातेय.  
 
'हेपेटायटिस 'A'
हेपेटायटिस 'A' विषाणूमुळे होणारा हा आजार आहे. हेपेटायटिस रुग्णांमध्ये सामान्यत: आढळून येणारा हा आजार आहे. दूषित पाणी किंवा दूषित अन्नामुळे हा आजार पसरतो. ज्या भागात सांडपाणी व्यवस्थापन योग्य नसतं अशा परिसरात हेपेटायटिस A चे रुग्ण आढळून येतात.  
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, हेपेटायटिस 'A' चा संसर्ग दिर्घकाळ होत नाही. याची लक्षणं तीन महिन्यांमध्ये हळूहळू नष्ट होतात. फोर्टिस रुग्णालयाचे पोटविकार तज्ज्ञ डॉ. राकेश पटेल सांगतात, "लहान मुलांना हेपेटायटिस A चा संसर्ग सहजतेने होण्याची शक्यता असते. मुलं यातून लवकर बरी होतात." हेपेटायटिस A वर कोणतंही ठोस औषध नाही. पण हेपेटायटिस A विरोधी लस घेतल्यामुळे संसर्गापासून संरक्षण मिळतं. भारतीय उपमहाद्वीप, आफ्रिका, दक्षिण-मध्य अमेरिका आणि युरोपातील पूर्वेकडील देशांमध्ये याचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळे या देशात प्रवास करायचा असेल तर लस अवश्य घ्यावी. 
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 
 
हेपेटायटिस 'A' ने ग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळेदेखील संसर्ग होण्याची शक्यता असते.
हेपेटायटिस A झालेल्या रुग्णांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते.
संसर्गाची लागण झाल्यानंतर 14 ते 28 दिवसांनी याची लक्षणं दिसू लागतात
ताप, भूक न लागणं, डायरिया, कावीळ याची काही लक्षणं आहेत. 
केंद्र सरकारच्या हेपेटायटिस नियंत्रण कार्यक्रमाच्या माहितीनुसार, हेपेटायटिस A ने ग्रस्त असलेल्या 5 ते 15 टक्के प्रकरणात यकृताला गंभीर इजा होते.
 
हेपेटायटिस 'B' 
हेपेटायटिस B विषाणूमुळे होणार हा आजार आहे. डॉ. राकेश पटेल सांगतात, "दूषित रक्त, दुसऱ्या व्यक्तीने वापरलेली सुई, शरीरातून निघणारे द्रव पदार्थ यामुळे याचं संक्रमण होऊ शकतं. आईकडून बाळाला हा आजार होण्याची शक्यता असते." 
 
हेपेटायटिसचा संसर्ग प्रामुख्याने ड्रग्जचं सेवन करणाऱ्यांमध्ये जास्त दिसून येतो. भारत, चीन, मध्य आणि दक्षिण आशियामध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो. या आजाराने ग्रस्त बहुतांश लोक दोन महिन्यात पूर्ण बरे होतात. मात्र काही लोकांना यामुळे दिर्घकाळ आजार होतो. याला 'क्रॉनिक' हेपेटायटिस असं म्हणतात. याच्या संसर्गामुळे लिव्हर सेसॉसिस आणि यकृताचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, "दरवर्षी 6 लाखांपेक्षा जास्त लोकांचा जगभरात हेपेटायटिसमुळे मृत्यू होतो. भारतात ही संख्या 1 लाखापेक्षा जास्त आहे. सद्यस्थितीत जगभरात 240 दशलक्ष तर भारतात 40 दशलक्ष लोक हेपेटायटिस 'B'ने ग्रस्त आहेत." 
 
HIV संसर्गाच्या तुलनेत हेपेटायटिस 'B' 50 ते 100 पट जास्त संसर्गजन्य आहे. 
कावीळ, अशक्तपणा, सतत उलट्या होणं आणि ओटीपोटात दुखणं ही सामान्य लक्षणं आहेत.
6 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना संसर्ग झाला तर आजार दिर्घकाळ होण्याची शक्यता.
हेपेटायटिस B विरोधात लस उपलब्ध आहे. जन्माला आल्यानंतर प्रत्येक बाळाला 24 तासांच्या आत ही लस देण्यात याची असं WHO चं म्हणणं आहे, त्यानंतर 6,10 आणि 14 व्या आठवड्यात पुढील लस द्यावी . 
याविरोधात ठोस उपचार नाहीत. बहुतांश लोकांमध्ये संसर्ग पूर्णत: बरा होत नाही. त्यामुळे दीर्घकाळ औषधं घ्यावी लागतात. 
हेपेटायटिस 'C' 
हेपेटायटिस C विषाणूमुळे होणारा हा आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरात हेपेटायटिस 'C' ने ग्रस्त रुग्णांची संख्या 58 दशलक्ष आहे. दरवर्षी या रुग्णसंख्येत 1.5 दशलक्ष रुग्णांची भर पडते. 
 
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हेपेटायटिस C चा संसर्ग प्रामुख्याने रक्ताच्या माध्यमातून होतो. काही प्रमाणात संक्रमित रुग्णाची लाळ, विर्य किंवा योनीमार्गातील द्रव पदार्थातून याचा संसर्ग पसरतो. पोटविकारतज्ज्ञ डॉ. पटेल पुढे सांगतात, "दुषित रक्त किंवा जन्माच्या वेळी आईकडून बाळाला हेपेटायटिस C चं संक्रमण होण्याची शक्यता असते." 
 
या आजाराची लक्षणं विषाणूने शरीरात शिरकाव केल्यानंतर 2 ते 6 आठवड्यांनी दिसू लागतात. 
80 टक्के रुग्णांमध्ये अजिबात लक्षणं दिसून येत नाहीत. 
ताप, अशक्तपणा, कावीळ, भूक न लागणं, उलटी, ओटीपोटात दुखणं, गडद रंगाची लवघी अशी याची काही लक्षणं आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, बहुशांत रुग्णांच्या शरीरातून हा विषाणू निघून जातो. पण काहींच्या शरीरात हा विषाणू दिर्घकाळ असतो. 
सद्य स्थितीत हेपेटायटिस C विरोधात कोणतीही लस उपलब्ध नाही. 
हेपेटायटिस C दिर्घकाळ असला तर औषध उपचारांनी यावर उपचार केला जातात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार स्तनपान, अन्न, पाणी किंवा इतरांना स्पर्श केल्यामुळे हेपेटायटिस C पसरत नाही.   
भारतात हेपेटायटिस C ने ग्रस्त रुग्णांची संख्या साधारणत: 6 ते 12 दशलक्ष असल्याची माहिती केंद्रीय हेपेटायटिस नियंत्रण कार्यक्रमात देण्यात आलीये.
 
हेपेटायटिस 'D' आणि 'E' 
हा आजार हेपेटायटिस 'B' चा संसर्ग असलेल्या रुग्णांनाच होतो. हेपेटायटिस 'D' विषाणूची संख्या वाढण्यासाठी, रुग्णाच्या शरीरात हेपेटायटिस B विषाणूची आवश्यकता असते. जगभरात हपेटायटिसने B ग्रस्त 5 टक्के रुग्णांना हेपेटायटिस D चा आजार होतो. हा संसर्ग इंजेक्शन, टॅटू किंवा दुषित रक्ताच्या संपर्काने पसरतो. 
 
हेपेटायटिस B विरोधी लशीमुळे हेपेटायटिस 'D' चा धोका कमी होतो. शरीरात संसर्ग झाल्यानंतर साधारण: 3 ते 7 आठवड्यांनी याची लक्षणं दिसू लागतात. ताप, अशक्तपणा, कावीळ, भूक न लागणं, उलटी, ओटीपोटात दुखणं, गडद रंगाची लवघी अशी याची काही लक्षणं आहेत. 
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, हेपेटायटिस 'E' चा संसर्ग सौम्य आणि अत्यंत कमी काळाकरिता होतो. याचं संक्रमण प्रामुख्याने दुषित पाण्यामुळे पसरतं. या आजाराचे रुग्ण जगभरात आढळून येत असले तरी, पूर्व आणि दक्षिण आशियामध्ये जास्त आढळून येतात. 
 
अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य सेवा हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. या देशात हेपेटायटिस E मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. विषाणू शरीरात शिरल्यापासून याचा संसर्ग 2 ते 10 आठवड्यात दिसून येतो. 15 ते 40 वर्ष वयोगटातील लोकांमध्ये याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळतो. 
 
हेपेटायटिस E ची लक्षणं हेपेटायटिसच्या इतर आजारांसारखीच आहेत. तज्ज्ञ सांगतात, हेपेटायटिसवर उपचार शक्य आहेत. हा आजार बरा होणारा आहे. पण लक्षणं ओळखता आली नाही तर, लिव्हर सेसॉसिस होऊ शकतो किंवा यकृताला गंभीर इजा होण्याची शक्यता असते. 
 
हेपेटायटिसवर निर्बंधासाठीचे उपाय काय?   
हेपेटायटिस A आणि B विरोधी लस घ्यावी . 
लैगिंक संबंध करताना कॉन्डोम वापरावं.
हेपेटायटिस सूईच्या माध्यमातून पसरू शकत असल्याने ड्रग्जचं सेवन करू नये.
मद्यपान करू नये. दुषित पाण्याचं सेवन करू नये.
शारीरिक आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता ठेवावी.
हेपेटायटिसचं निदान करण्यासाठी रक्ताची चाचणी किंवा यकृताचं कार्य सुरळीत सुरू आहे का नाही हे तपासण्यासाठी लिव्हर फंक्शन टेस्ट केली जाते. यकृताला इजा झाली आहे का नाही हे तापासण्यासाठी अल्ट्रासाउंड टेस्ट केली जाते.        
 
हेपेटायटिसविरोधी लस कोणी आणि कधी घ्यावी? 
हेपेटायटिस 'A' विरोधी लस 1 ते 18 वयोगटातील मुलांना दोन किंवा तीन डोसमध्ये देण्यात येते. प्रौढ व्यक्तींना लशीचा पहिला डोस दिल्यानंतर सहा ते बारा महिन्यांमध्ये बूस्टर डोस घेणं गरजेचं आहे. ही लस 15 ते 20 वर्षांपर्यंत आजारापासून संरक्षण देते.    
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार हेपेटायटिस विरोधी लशीचा डोस घेतल्यांतर साधारण 15 वर्षांपर्यंत संरक्षण मिळतं. भारतात राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत हेपेटायटिस 'B' ची लस देण्यात येते. सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या मार्गदर्शक तत्वानुसार नवीन जन्मलेल्या अर्भकापासून 18 वर्षापर्यतच्या सर्व मुलांना हेपेटायटिस B ची लस देण्यात यावी. 
 
डॉ. पटेल म्हणाले, "नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचं प्रमाण वाढलंय. 25 टक्के रुग्ण सद्यस्थितीत याने ग्रस्त आहेत. याचं प्रमुख कारण बदलेली जीवनशैली आणि लठ्टपणा आहे."
 
Published By- Priya Dixit