शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: बुधवार, 4 जानेवारी 2023 (15:00 IST)

Medicated oil केस आणि त्वचेसाठी औषधी तेल

सध्या केसांच्या समस्या वाढताना दिसताहेत. प्रदूषणाचं प्रमाण वाढत असताना केस आणि त्वचेवर त्याचा स्पष्ट परिणाम दिसतो. मात्र केसांवर अधिक परिणाम दिसण्याची अनेक कारणं आहेत. सध्या केसांचं सौंदर्य आणि स्वच्छता राखताना अनेक रसायनयुक्त प्रसाधनांचा वापर वाढतोय. दर्जा न बघता खरेदी केलेली अशी प्रसाधनं केसांच्या मुळांनाच हात घालतात. तीव्र प्रसाधनांमुळे केसांची मुळं कमकुवत होतात, केसांचा पोत बिघडतो आणि तक्रारींची मालिका सुरू होते. यावर उपाय म्हणून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तेलाचा मसाज करणं हा पर्याय आहे. यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं त्याचप्रमाणे डोकंही शांत राहतं. पण केवळ तेल पुरेसं नाही. काही उपायानं हे तेल अधिक उपयुक्त बनवता येऊ शकतं. 
 
तिळाच्या तेलात मेथीदाणे भिजत घाला. आता हे तेल मंद आचेवर गरम होऊ द्या. तेल गार झाल्यावर गाळून मेथीदाणे बाजूला करा. आता हे तेल अधिक औषधी आणि परिणामकारक आहे. 
 
केसांसाठी आवळ्याची उपयुक्तता आपण जाणतो. आता हे मऊसर आवळे कुकरमध्ये ठेवून चार-पाच शिट्या करा. आवळ्याचा गर निघेल. हा गर गाळून घ्या. आता या मिश्रणात हवं ते तेल एकत्र करा आणि अर्धा तास गरम करा. थंड झाल्यावर तेल बाटलीत भरून ठेवा. या तेलानं केलेला मसाज अधिक चांगले परिणाम देईल. 
 
सुकलेला आवळा तेलात मिसळा. तेल उकळू द्या. थंड झाल्यावर आवळ्यासहित तेल बाटलीत भरा. 
 
खोबरेल तेलात बदाम मिसळा आणि तेलाला चांगली उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर तेलाचा रंग बदलेल. रंग बदलल्यावर तेल आचेवरून उतरवा आणि थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवा. 
 
खोबरेल तेलात मेथीदाणे घालून चार-पाच दिवस तसेच ठेवा. त्यानंतर गाळून तेल बाटलीत घाला. हे तेल अधिक उपयुक्त झालेलं असेल.