बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. आयपीएल लेख
Written By वेबदुनिया|

फिरकीचा जादूगार वॉर्न

ND
नाव: शेन किथ वॉर्न
जन्‍म: 13 सप्टेंबर, 1969, ब्‍लोमफोंतेन, ऑरेंज फ्री स्‍टेट
संघ: आस्‍ट्रेलिया, हॅंपशायर, आयसीसी वर्ल्ड इलेव्हन
शैली: उजव्या हाताचा फलंदाज आणि लेग स्पिन गोलंदाज

फिरकीचा जादूगार ही उपाधी शेन वॉर्नला अतिशय फिट बसणारी आहे. या जादूगाराकडे काय नाहीये? फ्लिपर, लेगब्रेक, गुगली अशी समोरच्या फलंदाजाला गोंधळात टाकणारी अस्त्रे त्याच्याकडे आहेत. त्याच्या चेंड़ू असा काही स्पिन होतो, की भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडते. १९९३ च्या जूनमध्ये मॅंचेस्टरला वॉर्नने इंग्लंडच्या माइक गॅटिंगला ज्या चेंडूवर बाद केले तो विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट चेंडू होता, असे म्हटले जाते. वॉर्नच्या श्रेष्ठत्वाची कल्पना यायला एवढे पुरेसे आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला हा फिरकीचा जादूगार आयपीएलमध्ये नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा तो प्रशिक्षक आणि कर्णधार अशा दोन्ही भूमिकेत आहे.

वॉर्न सुरवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला तेव्हा त्याचा प्रभाव अजिबात पडला नव्हता. पण २००० नंतर अशी काही जादू घडली की प्रत्येक सामन्यागणिक त्याची कामगिरी उंचावत गेली. याच वर्षी त्याने विसाव्या शतकातील पाच सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंमध्ये स्थान मिळवले. विशेष म्हणजे या पाचही क्रिकेटपटूंमध्ये तो एकमेव फिरकी गोलंदाज होता. वॉर्न ही चीज काय आहे ते एवढ्यावरूनही कळून येईल.

वॉर्नने कारकिर्दीत १००० हून अधिक बळी मिळवले आहेत. यात कसोटी आणि एकदिवसीय सामन्यातील बळीही आहेत. कसोटीत ७०८ बळी मिळविण्याचाही विश्वविक्रम वॉर्नच्या नावावर काही काळापर्यंत होता. याशिवाय तीन हजार धावाही त्याच्या खात्यावर जमा आहेत. विशेष म्हणजे त्यात एकही शतक नाही आणि हाही एक विक्रम आहे.

मैदानावर प्रतिस्पर्धी संघाशीही अतिशय मित्रत्वाने वागणारा वॉर्न मैदानाबाहेर मात्र चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. अनेक लफड्यांत तो अडकला होता. त्यामुळे अनेकदा त्याच्यावर बंदीही घालण्यात आली. असा हा फिरकीचा जादूगार कारकिर्दीच्या शिखरावर असताना २००७ मधील जानेवारीत क्रिकेट जगतातून निवृत्त झाला.