बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 29 नोव्हेंबर 2018 (12:17 IST)

तीची पर्स

तिच्या पर्समधून मोबाईल ची रिंगटोन वाजत होती.
ती शाळेतून नुकतीच येऊन चहा करत होती.. 
"फोन रिसिव्ह कर" त्याने रागानेच तिला म्हटलं.
"मी जरा कामात आहे. कोणाचा आहे तो तुम्ही पहा." ती शांतपणे म्हणाली.
 
शेवटी मोबाईल घेण्यासाठी त्याने पर्स हातात घेतली तर तो मोबाईल नेमका कोणत्या कप्प्यात आहे, हे काही त्याला समजेना.
 
मध्येच त्याच्या हाताला गोळ्यांचे पॅकेट लागलेे, तर मधूनच पिना, आरसा, रुमाल, पावडर, बॉटल, फुले, पेन, चाव्या, ह्या  वस्तू लागल्या. दुसऱ्या कप्प्यात हात घालेपर्यंत एक पुस्तक अन डायरी हाताला लागली. पर्सच्या छोट्याशा कप्प्यात चॉकलेटस् ठेवली होती.
 
खरं म्हणजे त्याने मोबाईल शोधायला पर्समध्ये हात घातला होता. पण त्याला त्याचवेळी अनेकगोष्टी हाती आल्या.
 
त्याचा हात कळतनकळत स्वतःच्या खिशाकडे गेला तर त्याच्या खिशात नोटांशिवाय काहीच नव्हते. तो विचार करू लागला,
खरंच पर्समधील मोबाईलप्रमाणे तिच्या मनाचाही कधीच थांगपत्ता लागत नाही. नेमके तिला काय हवे आहे याचाही ती पत्ता लागू देत नाही. सर्वांची काळजी घेणे एवढेच तिला ठाऊक असते.
 
पर्समधील डायरीत सर्व गोष्टींच्या नोंदी तिने ठेवलेल्या असतात, तर मुलांना खुश ठेवण्यासाठी  छोट्याशा कप्प्यात ती चॉकलेटही ठेवते. कधी बरे वाटत नाही असे म्हणेपर्यंत हातात तिने चटकन गोळी ठेवलेली असते. आणि त्याचबरोबर स्वतःचीही ती तशीच काळजी घेते. तिच्या पर्समध्ये कायमच रुमाल,आरसा आणि पावडर ही असतेच. सर्व टेन्शनपासून स्वतःला खुश ठेवण्यासाठी तिने स्वतःस पुस्तकवाचना सारखे छंदही जोपासले आहेत.
 
आणि आपण काय करतो, तर सतत खूप काम आहे ह्या  सबबीखाली आळशी बनत असतो. प्रत्येक कामाची तिच्याकडून अपेक्षा करून स्वतःस अपंग बनवीत असतो.
 
आज तिची पर्स त्याला बरेच काही सांगत होती. ही पर्सच तिच्यासाठी बऱ्याच वेळा आधार असते.
 
ज्यावेळेस ती एकटीच कुठेही जाते त्यावेळेस मात्र पर्सला तिने घट्ट धरून ठेवलेले असते. साडी, ड्रेस अथवा इतर कोणताही पेहराव तिने घातलेला असो, पण तिच्या सोबतीला पर्स ही कायम असतेच.
 
तिच्या पर्सचे विविध कप्पे तिच्या मनाची उकल करत असतात.
बऱ्याच वेळा तिने अडकवलेली लॉंगपर्स ती बिनधास्त, तेवढीच धीट आहे असंच सांगत असते, तर तिच्या बघलेतील मोठी पर्स, त्या मधील सामान अनेक जबाबदाऱ्यांचे सहज स्पष्टीकरण देत असते.
 
जर एखाद्या स्त्रीच्या स्वभावाचा अथवा मनाचा तळ शोधायचा असेल तर प्रत्येक पुरुषाने तिची पर्स नक्कीच एकदा तरी पहावीच.........!!!