शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 1 जुलै 2019 (11:37 IST)

मीच एकटी का सावळी...

रुसुन बसली एकदा
कृष्णवाटिकेत बकुळी
सगळी पुष्प लेवती मोहक रंग
मीच एकटी का सावळी
 
वाटिकेतील फुले पाने लता
कुजबुजती एकमेकांच्या कानात
नाजुक साजुक आपली कन्या
का बरे मुसमुसे एका कोपर्‍यात
 
गेल्या तिला समजवायला
मोगरा सोनटक्का सदाफुली
बकुळी म्हणे उदास होऊन
शुभ्रतेपुढे तुमच्या दिसे मी कोमेजलेली
 
गुलाबराजा आला लवाजमा घेऊन
म्हणे कसले हे वेड घेतले मनी
बकुळी प्रश्न विचारी मुसमुसुन
का मोहक पाकळ्या लेवु शकत नाही तनी 
 
सरतेशेवटी आला पारिजातक
सडा पाडत बकुळीच्या गालावर
थांब तुला सांगतो गुपित
मग हास्य फुलेल भोळ्या चेहर्‍यावर
 
कृष्णाने माझी भेट दिली सत्यभामेला
सडा मात्र पडे रुक्मिणीच्या अंगणात
भोळ्या राधेला काय बरं देऊ
हा विचार अविरत चाले भगवंताच्या मनात
 
तितक्यात आलीस तु सामोरी
गंधाने दरवळली अवघी नगरी
शुभ्र नाजुक तुझी फुले पाहुन
भगवंत म्हणती हिच राधेला भेट खरी
 
अलगद तुला घेता हाती
स्पर्शाने तु मोहरलीस
भरभरुन सुगंध देऊन हरीला
सावळ्या रंगात मात्र भिजुन गेलीस
 
ऐकुन हे बोल प्राजक्ताचे
बकुळी देहभान विसरुन गेली 
अलौकिक आनंदाने होऊन तृप्त
राधाकृष्णाच्या प्रेमरंगात रंगली