शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (11:04 IST)

निळा कोल्हा Blue Fox Moral Story

एका जंगलात एक कोल्हा होता. एके दिवशी खूप भूक लागल्याने तो गावात जातो. त्याला पहाताच गावातील कुत्रे त्याचा पाठलाग करू लागतात. आता आपल्याला हे कुत्रे फाडून खाणार या भीतीने कोल्हा एका धोब्याच्या घरात शिरतो. पण कुत्रे अजूनही आपल्याच मागे आहेत हे लक्षात आल्यावर तिकडच्या एका पिंपात उडी मारून लपतो.
 
त्या पिंपात नीळ असते. त्या निळीमुळे कोल्ह्याचे अंग निळे होऊन जाते. थोड्यावेळाने कुत्रे नाहीत बघून कोल्हा जंगलात धूम ठोकतो. त्याच्या निळ्या रंगातला अवतार बघून जंगलातले सिंह, वाघ, लांडगे घाबरून जातात. आपल्या जंगलात कोण हा विचित्र प्राणी आला हा विचार ते करू लागतात.
 
आपल्या निळ्या रंगाला जंगलातले सगळे प्राणी भ्याले हे बघून कोल्ह्याला वाटले आता आपल्याला या जंगलात बस्तान बसवता येईल. सर्व प्राण्यांना तो म्हणाला, ''मला ब्रह्मदेवाने तुमच्या रक्षणासाठी उत्पन्न केले. प्राण्यांना कोणीच राजा न उरल्याने ब्रह्मदेवाने मला राजा केले असून माझे नाव ककुद्रुम असे ठेवले आहे.''
 
त्याचे हे सगळे बोलणे ऐकल्यावर सर्व प्राण्यांनी 'होय महाराज' करीत एकच गिल्ला केला. आपली युक्ती सफल झाल्याचे लक्षात येताच, सिंहाला प्रधानपद दिले. वाघाला पलंगावर पहारा करण्याचे काम दिले तर लांडग्याला द्वारपाल म्हणून नेमले. कोल्ह्यांना राज्याबाहेर हाकलले. सिंह, वाघ रोज कोल्ह्यासाठी निरनिराळे प्राणी मारून खाण्यासाठी आणू लागले.
 
एके दिवशी अचानक राजवाड्याबाहेरून कोल्हेकुई ऐकू येत होती. त्याबरोबर या नव्या महाराजांच्या अंगावर रोमांच उभे राहिले... आणि सहजगत्या तेही ओरडू लागले. त्याबरोबर आपण ज्याला राजा समजत होते तो एक क्षुद्र कोल्हा आहे हे लक्षात येताच, सिंह आणि वाघाने त्याचा फडशा पाडला. कोल्होबाला पळायचीसुद्धा संधी दिली नाही.
 
तात्पर्यः कोणत्याही व्यक्तीवर त्याची पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय तसेच अनुभव घेतल्याशिवाय विश्वास टाकू नये.