गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Updated : शनिवार, 27 जुलै 2024 (08:48 IST)

बालकथा : वाल्याचा वाल्मीकी झाला

valmiki
बालमित्रांनो, आज आपण वाल्या कोळी आणि नारदमुनी यांची गोष्ट ऐकू या. पूर्वी रानात एक वाल्या कोळी नावाचा दरोडेखोर राहत होता. तो काय करायचा? रानात एक मार्ग होता. तेथून येणार्‍या-जाणार्‍या लोकांना भीती दाखवून आणि धाक दाखवून लुटायचा. त्यांचे पैसे आणि दागिने काढून घ्यायचा. त्या पैशावर आपले घर चालवायचा. त्याला एकदा नारदमुनींनी बघितले. नारदमुनी हे देवांचे ऋषी आणि विष्णूचे भक्त होते. ते 'नारायण नारायण।' हा नामजप करायचे. 
 
नारदमुनींना वाईट वाटले. वाल्या कोळी जर असेच पाप करू लागला, तर त्याला नरकात शिक्षा भोगावी लागेल. ते लगेच वाल्या कोळीकडे गेले आणि त्याला म्हणाले, ''अरे, तू हे पाप का करतोस? लोकांना त्रास देऊन त्यांचे पैसे घेणे हे पाप आहे.'' त्यावर वाल्या कोळी म्हणाला, ''मी हे पाप माझ्या बायका-मुलांना खायला-प्यायला मिळावे म्हणून करतो.'' तेव्हा नारदमुनी म्हणाले, ''तू त्यांच्यासाठी करतोस, तर मग जा. त्यांना विचार की, मी पाप करून सगळे तुम्हाला देतो. तर माझ्या पापाचा अर्धा वाटा तुम्ही घेणार का?'' वाल्या कोळी घरी गेला आणि त्याने आपल्या बायका-मुलांना विचारले. तेव्हा ती म्हणाली, ''तुमच्या पापाचे फळ आम्ही भोगणार नाही. तुम्ही लोकांना त्रास देऊन पैसे मिळविता, तर त्याचे पाप तुम्ही भोगा.'' हे ऐकल्यावर वाल्या कोळ्य़ाला वाईट वाटले. आपण एवढी वर्षे निरपराध लोकांना फार त्रास दिला. त्याला त्याच्या कर्माचा पश्‍चात्ताप झाला. तो लगेच नारदमुनींना शरण गेला आणि म्हणाला, ''आपण मला क्षमा करा. या घोर पापातून मला मुक्त करा.'' तेव्हा नारदमुनी प्रेमाने म्हणाले, ''वाल्या, तुला पश्‍चात्ताप होतोय ना? आता तुझ्या पापातून मुक्त होण्यासाठी तू 'राम राम' असा नामजप कर. जोपयर्ंत मी परत येत नाही तोपयर्ंत तू इथेच नामजप करत बस. मी लगेच जाऊन येतो,'' असे म्हणून नारदमुनी गेले. आता वाल्या कोळी एका जागी बसून नामस्मरण करू लागला. त्याला 'राम राम' असे म्हणता येत नव्हते; म्हणून तो 'मरा मरा' असा नामजप करायचा; पण तो नामस्मरण फार मनापासून करत होता. असे करता करता एक दिवस गेला, चार दिवस गेले, एक आठवडा झाला, तरी वाल्या कोळी नामस्मरणच करत होता. १ मास, २ मास असे करत करत वर्षे झाली; पण नारदमुनी आले नाहीत; पण वाल्याचा नामजप अखंड चालूच होता. तो ज्या रानात बसला होता, तेथे वाल्या कोळ्य़ाच्या भोवती रानातील लाल मुंग्यांनी वारूळ बनविले, तरीही वाल्या कोळी उठला नाही. हळूहळू वाल्याचे सगळे शरीर मुंग्यांच्या वारुळाखाली झाकले गेले. त्याने मनाशी निश्‍चय केला होता की, नारदमुनींनी सांगितलंय ना? ते येईपयर्ंत मी इथेच नामस्मरण करत बसणार. असे न खाता-पिता शेकडो वर्षे नामजप करणार्‍या वाल्याला देव प्रसन्न झाला आणि त्याला म्हणाला, ''मी तुझ्या नामस्मरणामुळे प्रसन्न झालो आहे. तुझे सगळे अपराध मी क्षमा करतो. तू आता वाल्या कोळी नाहीस. आजपासून वाल्मीकी ऋषी आहेस. असे म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला. याच वाल्मीकी ऋषींनी 'रामायण' लिहिले. वाल्मीकी ऋषी फार प्रेमळ होते. त्यांच्या आश्रमात वाघ आणि हरिणसुद्धा एकत्र राहायचे. हे सगळे कशामुळे झाले, तर नामस्मरणामुळे. मग आपणसुद्धा प्रतिदिन नामजप वहीत लिहूया. वाल्या कोळ्य़ाचा वाल्मीकी बनण्यासाठी त्याला नारदमुनींनी साहाय्य केले. मुलांनो, नारदमुनींच्या सत्संगामुळे वाल्याला आपल्या पापाचा पश्‍चात्ताप झाला. म्हणजे सत्संगामुळे आपण चांगले बनतो; पण आपली संगत वाईट असेल, तर आपल्याला चांगले बनावे वाटेल की नाही? मग आपण नेहमी चांगल्याच मुलांच्या संगतीत राहिले पाहिजे.