शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: बुधवार, 31 जानेवारी 2024 (15:15 IST)

हळदीमधली भेसळ कशी ओळखता येते? जाणून घ्या

haldi
भारतीय अन्न पदार्थांमध्ये हळद हा एक अत्यंत महत्त्वाचा मसाला आहे. हळदीचा वापर केवळ जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठीच नव्हे तर पदार्थांना आकर्षक रंग येण्यासाठीही केला जातो. हळदीशिवाय स्वयंपाक करणं हे अनेकदा अत्यंत कठीण काम असतं.
 
त्याचबरोबर अन्नाशिवाय औषधांमध्येही याचा विशेष वापर केला जातो. अँटी इन्फ्लामेटरी, अँटी ऑक्सिडंट, अँटि सेप्टिक आणि अँटि व्हायरल म्हणून याला उपयोगी समजलं जातं.
 
कच्ची हळद ही सोनेरी रंगाची असते हे तुम्हाला माहिती आहे का? हळद खरेदी करायची असते तेव्हा चमचमता रंग पाहून घेतली जाते. पण कधीकधी कृत्रिम रंगाचा वापर करुन ग्राहकांची दिशाभूल केली जाते.
 
जी हळद तुम्ही खाण्यासाठी वापरत आहात ती भेसळयुक्त आहे किंवा नाही, हे कसं ओळखावं? बीबीसी गुजरातीनं हळदीची गुणवत्ता कशी ओळखावी याबाबत तज्ज्ञांशी चर्चा केली.
 
भेसळयुक्त हळद कशी तयार करतात?
आंतरराष्ट्रीय बाजारात हळदीला प्रचंड मागणी आहे. त्यामुळं अधिक नफा मिळवण्यासाठी अनेकदा हळदीमध्ये भेसळ केली जाते. हळदीच्या पावडरमध्ये स्टार्च, करक्युमिन आणि सिंथेटिक तसंच कृत्रिम रंगाची भेसळ केली जाते.
 
बीबीसी गुजरातीनं या भेसळीबाबत अहमदाबाद महानगर पालिकेचे माजी खाद्य पदार्थ विश्लेषक अतुल सोनी यांच्याशी चर्चा केली. अतुल सोनी यांच्याकडं या क्षेत्रातील 30 वर्षांचा कामाचा अनुभव आहे.
 
त्यांच्या मते, हळदीमध्ये भेसळ करण्याचा मुख्य उद्देश याच्या उत्पादनाचा खर्च कमी करणं हा आहे. याची भेसळ तीन प्रकारे केली जाते.
 
"पहिल्या पद्धतीत मिश्रणासाठी स्टार्च म्हणजे पीठाचा वापर केला जातो. त्यासाठी गहू किंवा तांदळाच्या पीठाचा वापर केला जातो."
 
"दुसरी गोष्ट म्हणजे उत्पादक चांगल्या दर्जाची हळद आणि कमी दर्जाची हळद एकत्र करून नफा वाढवतात. तर तिसऱ्या पद्धतीत यात कृत्रिम रंगाचा वापर केला जातो. कारण ग्राहकासाठी हळदीच्या रंगावरुनच त्याची गुणवत्ता ठरत असते. चांगल्या हळदीचा रंग गडद पिवळाच असेल असं काही नाही. ग्राहकाला मात्र ते माहिती नसतं. कृत्रिम रंगांमध्ये लेड क्रोमेट याचा समावेश असतो, हे त्यांना माहिती नसतं."
 
भेसळीच्या आणखी एका पद्धतीबाबत बोलताना ते म्हणाले की, "तेलात विरघळणारी डाय मिसळल्यास हळदीच्या उत्पादनाचा खर्च कमी होतो. ते आरोग्यासाठी सर्वात धोकादायक असतं. कारण हे पदार्थ कार्सिनोजेनिक आहेत. म्हणजे दीर्घकाळ वापर केल्यास ते कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकते.
 
भेसळीबाबत जागरुकता वाढवणं गरजेचं असल्याचं ते सांगतात. तसंच अतुल सोनी यांनी हळदीची शुद्धता कशी तपासावी तेही सांगितलं.
 
त्यांच्या मते, "हळदीचा विशेष असा रंग नसतो. त्यामुळं पाहून ती शुद्ध आहे की भेसळयुक्त हे कोणीही सांगू शकत नाही. पण ग्राहकाला हळदीची शुद्धता तपासायची असेल तर त्यांना ते 100 रुपयांमध्येही करता येऊ शकतं. "
संबंधित शासकीय प्रयोगशाळेतून त्याची गुणवत्ता तपासणी करावी. तिथून मिळणाऱ्या रिपोर्टवरून हळदीत भेसळ असल्याचं लक्षात आल्यास ग्राहक निर्मात्या विरोधात गुन्हा दाखल करू शकतात.
 
ग्राहकांनी चांगल्या ब्रँडचीच हळद विकत घ्यावी असा सल्लाही सोनी यांनी दिला आहे.
 
अतुल सोनी म्हणाले की, "चांगली कंपनी बाजारात उत्पादन विकण्यासाठी अॅगमार्क आणि एफएसएसएआयद्वारे परवानगी मिळत असते. तरीही ग्राहकाला भेसळीचा संशय असेल तर, ते निर्मात्यांना कोर्टात खेचू शकतात."
 
ग्राहकांनी बाजारात मिळणारी सुटी हळद किंवा मसाले विकत घेऊ नये. कारण त्याठिकाणी निर्मात्याबाबत माहिती मिळत नाही, असंही सोनी यांनी सांगितलं.
 
लेड क्रोमेट काय आहे?
हळदीला गडद सोनेरी रंग देण्यासाठी लेड क्रोमेट नावाच्या धातूचा वापर केला जातो.
 
लेड क्रोमेट दोन धातूंच्या मिश्रणापासून बनतं. लेड (शिसं) आणि क्रोमियम. रंग देण्यासाठी लेड क्रोमेट एक उपयोगी रसायन आहे. या रसायनाचा वापर हळदीची मुळं म्हणजे हळकुंड रंगवण्यासाठीही केला जातो.
 
हळदीमधील प्राथमिक घटक हा करक्युमिनोइड्स आहे. त्यामुळं हळदीला औषधी तत्वं आणि नैसर्गिक पिवळा रंग मिळतो.
 
हळदीचं वजन वाढवण्यासाठीही लेड क्रोमेटचा वापर केला जातो. अनेकदा दळताना, पॅकेजिंगदरम्यान चुकूनही ते हळदीत मिसळलं जातं.
 
लेड क्रोमेटचे आरोग्यावरील दुष्परिणाम?
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार जगात लेड (शिसं)मुळं होणाऱ्या विषबाधेचं प्रमाण भारतात सर्वाधिक आहे.
 
संशोधकांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार लेड क्रोमेटच्या वापरामुळं मूत्रपिंड आणि मेंदूवरही दुष्परिणाम होऊ शकतो. मुलांच्या मेंदूचा विकास होण्यात त्यामुळं अडथळा येऊ शकतो.
 
शिस्यामुळं होणाऱ्या विषबाधेचा लहान मुलांच्या बौद्धिक क्षमेतेवर आयुष्यभर परिणाम होऊ शकतो. त्याचा एखाद्या देशावरही सामाजिक किंवा आर्थिक प्रभाव पडू शकतो.
 
अमेरिकेची पर्यावरण आणि आरोग्य कंपनी प्युअर अर्थच्या संशोधकांनी 2018 मध्ये पहिल्यांदा भारताच्या बिहारमधील लोकांच्या रक्ताची चाचणी केली होती. त्यावरुन लक्षात आलं की, चाचणीत समावेश असलेल्या काही जणांच्या रक्तात शिस्याचं प्रमाण अधिक होतं.
 
प्योर अर्थमधील संदीप दहिया यांच्या मते, "आम्हाला जवळपास प्रत्येक घरातील हळदीत शिस्याचं प्रमाण अधिक आढळलं."
 
 
निती आयोगाच्या रिपोर्टनुसार दीर्घकाळापर्यंत शिस्याच्या संपर्कात राहिल्यानं मानवी आरोग्यासाठी ते धोकादायक ठरू शकतं. त्यामुळं मज्जासंस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. तसंच यकृत, रक्त, किडनी, मेंदू अशा मानवी अवयवांमध्ये ते मिसळलं जातं आणि आजारांसाठी कारणीभूत ठरतं.
 
याच्या अल्पकाळ संपर्कात आल्यानं डोकेदुखी, स्मृतीभ्रंश, अशक्तपणा, बद्धकोष्टता, अॅनिमिया, सूज, पोटदुखी आणि शरिरात मुंग्या येणं असा त्रास होऊ शकतो.
 
एकदा शिसं तुमच्या शरिरात मिसळलं गेलं की ते, रक्त, यकृत, मूत्रपिंडं, फुफ्फुसं, हृदय आणि हाडं तसंच दातांसारख्या अवयवांपर्यंत पोहोचतं. बहुतांश शिसं हे लघवी किंवा संडास या माध्यमातून शरिराबाहेर पडतं.
 
गर्भावस्थेदरम्यान हाडांमध्ये असलेलं शिसं रक्तात मिसळलं जातं आणि शरिरात विकसित होणाऱ्या भ्रूणाच्या संपर्कात येतं.
 
शिस्याच्या संपर्कात आल्यानं शरिराच्या अनेक यंत्रणांवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः ते लहान मुलं आणि प्रसुती होणाऱ्या महिलांसाठी हानिकारक असतं.
 
शरिरात हा धातू मेंदू, यकृत, मूत्रपिंड आणि हाडांमध्ये प्रवेश करतो. ते हाडं आणि दातांमध्ये जमा होतं.
 
हळद पावडर कशी बनते?
हळकुंडापासून पावडर बनवण्यासाठी सर्वांत आधी त्यातील आर्द्रता काढली जाते. व्यापारी हळद एका महिन्यासाठी मोठ्या, उन्ह असलेल्या खुल्या मैदानात ठेवतात. उत्पादक स्वतःच हळदीचं निरीक्षण करतात आणि त्याची तपासणी करतात.
 
हळकुंड वाळल्यानंतर त्याला पॉलिश केलं जातं. त्याठिकाणी ते एका ड्रममध्ये ठेवलं जातं आणि ते हातानं किंवा मोटारीनं फिरवलं जातं. नंतर हळदीचं वरचं साल काढलं जातं. म्हणजे त्याचा खरा रंग दिसून येतो.
 
त्या प्रक्रियेनंतर याची पावडर तयार होते.
 
वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारत मसाले उत्पादनात आघाडीवर आहे. भारताकडून होणारी मसाल्यांची निर्यात गेल्या नऊ वर्षांमध्ये दुप्पट झाली असून ती 3,995 कोटींवर पोहोचली आहे.
 
मानवी आरोग्यावरील विषारी धातूचा वाढता प्रभाव
एका उदाहरणाच्या माध्यमातून शरिरावर या धातूच्या अधिक प्रमाणामुळं होणाऱ्या नकारात्मक परिणामांची माहिती घेण्याचा प्रयत्न करुयात.
 
डिसेंबर 2020 मध्ये आंध्रप्रदेशच्या एलुरू शहरात 560 लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. यामध्ये बहुतांश मुलांचा समावेश होता.
 
या सर्वांना मळमळ, उलटी आणि डोळ्यात जळजळ होणे तसंच शुद्ध हरपणे अशा प्रकारची लक्षणं दिसत होती.
 
या सर्वामध्ये एका व्यक्तीनं जीव गमावला. तर इतरांना वाचवण्यात यश आलं होतं.
 
काही दिवसांनंतर आंध्रप्रदेश सरकारनं आजाराचं मुख्य कारण पिण्याच्या पाण्यात आढळणाऱ्या काही किटकनाशकांचे अवशेष असल्याचं जाहीर केलं. एम्स आणि नॅशनल इनव्हायरमेंटल इंजिनीयरिंग रिसर्च सेंटर (NEERI) नं घटनेचा तपास केला आणि निष्कर्ष मांडले.
 
या घटनेच्या रिपोर्टमध्ये एम्सनं म्हटलं की, बाजारात उपलब्ध दुधामध्ये शिस्याचं प्रमाण अधिक होतं आणि NEERI नं भूजल पातळीत पाऱ्याचं प्रमाण वाढल्याचं कारण दिलं होतं.
 
भारत हळदीचा सर्वांत मोठा उत्पादक आणि ग्राहक
हळदीचं उत्पादन घेणाऱ्या प्रमुख देशांचा विचार करता यात भारत, बांगलादेश, म्यानमार यांचा समावेश आहे. यापैकी भारत जगात हळदीचा सर्वात मोठा उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार आहे.
 
अमेरिकेतही त्याठिकाणच्या मुलांच्या रक्तात धातूचं प्रमाण वाढण्याचे प्रकार वाढत होते. या घटनेच्या तपासानंतर लक्षात आलं की, भारतातून जी कुटुंबं मसाले घेऊन अमेरिकेत गेले होते, त्यांच्या मुलांच्या रक्तामध्ये धातूचं प्रमाण होतं. त्यामुळं त्याठिकाणच्या अन्न आणि औषध विभागानं भारतीय पदार्थांच्या वापर टाळण्याचा सल्ला दिला होता.
 
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीनं केलेल्या अभ्यासात लक्षात आलं की, 2019 मध्ये बांगलादेशात मानवाच्या शरीरात धातू आढळण्याची प्रमाण वेगानं वाढत आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधानांनी याला राष्ट्रीय मुद्दा बनवलं आणि हळदीतून धातू पूर्णपणे काढण्यासाठी नवे नियम केले. दोन वर्षांमध्ये त्यांना बाजारातून भेसळयुक्त हळदीचं उत्पादन आणि विक्री पूर्णपणे थांबवण्यात यश आलं.
 
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीनं भारताला बांगलादेशच्या या प्रयत्नाकडून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे.
 
Published By- Priya Dixit