जगणं
येईल साठी, येईल सत्तरी
करायची नाही कुणीच चिंता,
प्रत्येक दिवस मजेत जगायचा
वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता.
वय झालं म्हातारपण आलं,
उगाच कोकलत बसायचं नाही.
विनाकारण बाम लावून,
चादरीत तोंड खुपसायचं नाही.
तुम्हीच सांगा छंद जोपासायला,
वयाचा संबंध असतो कां ?
रिकामटेकडं घरात बसून
माणूस आनंदी दिसतो कां ?
पोटा-पाण्यासाठी पोरं-सुना
घर सोडून जाणारच,
प्रत्येकाच्या आयुष्या मध्ये
असे रितेपण येणारच.
करमत नाही करमत नाही
सारखे-सारखे म्हणायचे नाही,
आवडत्या कामात दिवस घालवायचा
उगाचच कुढत बसायचं नाही.
घरातल्या घरात वा बागेत
हिंडाय-फिरायला जायचं,
वय जरी वाढलं असलं तरी
मनपसंत गाणं मनमोकळं गायचं.
गुडघे गेले, कंबर गेली
नेहमी नेहमी कण्हायचं नाही,
आता आपलं काय राहिलं?
हे फालतू वाक्य कधीच म्हणायचं नाही.
पिढी दर पिढी चालीरीतीत
थोडे फार बदल होणारच,
पोरं-पोरी त्यांच्या संसारात
कळत नकळत गुंतणारच.
तू-तू, मै-मै, जास्त अपेक्षा
कुणाकडूनही करायची नाही,
मस्तपैकी जगायचं सोडून
रोज थोडं थोडं मरायचं नाही.
स्वत:च स्वत:ला समजवायचं असतं
पुढे पुढे चालत राहायचं असतं,
वास्तू तथास्तू म्हणत असते
हे उमजून निरामय जगायचं असतं.
- सोशल मीडिया