रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (15:30 IST)

निवृत्त मी झालो, पण निवांत ती झाली

सकाळच्या पहिल्या चहाची
जबाबदारी माझ्यावर आली
दूध ऊतू जाऊ न देण्याची
काळजी माझ्या शिरी आली
निवृत्त मी झालो, निवांत ती झाली ।
 
आजचा नाष्टा ठरवायची 
आणि, करायची पाळी माझ्यावर आली
कांदा चिरताना आसवे गाळायची
वेळ आता माझ्यावर आली,
निवृत्त मी झालो, निवांत ती झाली ।
 
कुकरच्या शिट्यां मोजण्याची
आता मला सवय झाली
तव्यावरची गरम पोळीही
आताशा चटके देईना झाली
निवृत्त मी झालो, निवांत ती झाली ।
 
दुधाचा खाडा,पेपरचा खाडा
फोन बिल, लाईट बिल
हिशोब ठेवताना माझी
त्रेधातिरपीट झाली
निवृत्त मी झालो, निवांत ती झाली ।
 
घड्याळाच्या काट्याबरोबर
फिरण्यातून, ती मुक्त झाली
लवकर उठण्याची सवय 
आता, तीने सोडून दिली
निवृत्त मी झालो, निवांत ती झाली ।
 
माझ्यासाठी धावणारी ती
आता जरा थकू लागली
थकलेल्या तिच्या पावलांची
आता मला चाहूल लागली
निवृत्त मी झालो, निवांत ती झाली ।

-सोशल मीडिया