शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Updated : शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (17:25 IST)

मराठी भाषा विभागाचे ४ सर्वोच्च पुरस्कार जाहीर

वर्ष २०१८ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाटककार श्री. महेश एलकुंचवार यांना आणि श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार साहित्य प्रसार केंद्र या प्रकाशनास जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या वर्षीचा डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ भाषा वैज्ञानिक डॉ. कल्याण काळे यांना आणि मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार झाडीबोलीचे अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज एका पत्रकाद्वारे दिली.
 
श्री . पु.भागवत  व विंदा पुरस्कार निवड समितीमधील सदस्य  श्रीपाद भालचंद्र जोशी,  बाबा भांड आणि पाडगांवकर व केळकर पुरस्कार समितीतील सदस्य डॉ. सदानंद मोरे, दिलीप करंबेळकर व बाबा भांड यांनी, प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर चर्चा करुन, मा. मराठी भाषा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ह्या पुरस्कारांबाबत निर्णय घेतले.
 
मराठी भाषा गौरव दिनी म्हणजे दि. २७ फेब्रुवारी, २०१९ रोजी हे चारही पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या वतीने, मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहितीही श्री. विनोद तावडे, मंत्री, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी दिली.