भारत सासणे ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांची निवड करण्यात आली आहे. उदगीर येथे महामंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी सर्वांनुमते ही घोषणा करण्यात आली.
वर्षभरापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शेवट वादानेच नाशिक येथे झाला होता. याच संमेलनात ९५ वे संमेलन उदगीर (जि. लातूर) येथे होणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली होती. दरम्यान ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद कोणाला मिळणार याची चर्चा सुरु होती.
भारत सासणे हे वैजापूरला ४ एप्रिल २०१० रोजी झालेल्या ५ व्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते. बहिर्जी शिक्षण संस्थेतर्फे वसमत येथे ९ आणि १० नोव्हेंबर २०१४ या काळात आयोजित केलेल्या ३५व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपददेखील भारत सासणे यांच्याकडे होते. याशिवाय नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचे जळगाव येथे १४ फेब्रुवारी २०१६ रोजी भरलेल्या एक दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे समारोपीय सत्राचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषवलं आहे. सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने समग्र साहित्य सेवेबद्दल सूर्योदय पुरस्कार देऊनही सासणे यांना गौरवण्यात आलं आहे.
सासणे यांची ग्रंथ संपदा
अदृष्ट (दीर्घकथा संग्रह)
अनर्थ रात्र (दीर्घकथा संग्रह)
अस्वस्थ (दीर्घकथा संग्रह)
आतंक (दोन अंकी नाटक)
बंद दरवाजा (कथासंग्रह)
मरणरंग (तीन अंकी नाटक)
राहीच्या स्वप्नांचा उलगडा (कादंबरी)
लाल फुलांचे झाड (कथासंग्रह)
वाटा आणि मुक्काम (सहलेखक – आशा बगे, मिलिंद बोकील, सानिया)
विस्तीर्ण रात्र (दीर्घकथा संग्रह)
शुभ वर्तमान (कथासंग्रह)