ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं निधन
मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक दत्ताराम मारुती उर्फ द. मा. मिरासदार यांचं निधन झालं. मराठी साहित्यात विनोदी लेखन आणि कथाकथनामुळे ते वाचकप्रिय ठरले.
द. मा मिरासदारांचा जन्म 14 एप्रिल 1927 रोजी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथं झाला. पत्रकारितेपासून त्यांनी साहित्यसेवेस सुरुवात केली.
पुण्यात काही काळ पत्रकारिता केल्यानंतरते अध्यापन क्षेत्राकडे वळले. 1961 ते 1987 या काळात औरंगाबादमधील देवगिरी महाविद्यालय आणि पुण्यातील गरवारे महाविद्यालयात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केलं.
1950 मध्ये 'सत्यकथा' मासिकात प्रसिद्ध झालेल्या 'रानमाणूस' या पहिल्याच कथेपासून त्यांच्या लेखन कारकीर्दीला सुरुवात झाली.
द. मा. मिरासदारांच्या कथांमध्ये ग्रामीण भागाचं कथानक असे. कथांमधील पात्रांना ते अत्यंत विनोदी पद्धतीनं मांडत. तितकचं तीव्रतेनं ते त्या पात्रांना कथाकथनामधून प्रेक्षकांसमोर सादर करत.
विनोदी लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या मिरासदारांनी स्पर्श, विरंगुळा आणि कोणे एके काळी यांसारख्या गंभीर कथाही लिहिल्या.
1998 साली परळी-वैजनाथ इथं आयोजित केलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते.
मिरासदारांनी संवादलेखन केलेल्या 'एक डाव भुताचा' आणि 'ठकास महाठक' या दोन सिनेमांना अनेक पारितोषिके मिळाली. तसंच, महाराष्ट्र राज्याचा विंदा जीवनगौरव पुरस्कार (2015) मिळाला.
प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कारानेही 2014 साली त्यांना गौरवण्यात आले होते.
द. मा. मिरासदार यांचं निवडक साहित्य :
मिरासदारी
हसणावळ
हुबेहूब
गप्पा गोष्टी
गंमत गोष्टी
गुदगुल्या
चकाट्या
चुटक्यांच्या गोष्टी
ताजवा
फुकट
भोकरवाडीच्या गोष्टी
माकडमेवा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून मिरासदारांना आदरांजली वाहिली.