1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: शनिवार, 24 जून 2023 (08:41 IST)

‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ कविता संग्रहाला युवा; तर ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

social media
नवी दिल्ली: साहित्य क्षेत्रात मानाचे समजले जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या ‘युवा’ आणि ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. मराठी भाषेसाठी  विशाखा विश्वनाथ या युवा साहित्य‍िकेच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ या कविता संग्रहास युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.  तर बाल  साहित्यासाठी  बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या  ‘छंद देई आनंद’  या कविता संग्रहास बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
 
साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत साहित्य अकादमीच्या युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. प्रत्येक भाषेतील पुरस्कारांसाठी 3 सदस्यीय निर्णायक मंडळाच्या निर्धारित निवड प्रक्रियेचे पालन करत उत्कृष्ट साहित्य लेखनाची निवड पुरस्कारांसाठी  करण्यात आली आहे. दोन्ही श्रेणीतील पुस्तके मागील पाच वर्षांमध्ये 1 जानेवारी 2017 पासून ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत प्रकाशित झालेली आहेत.
 
युवा साहित्य पुरस्कारांमध्ये 20 भाषेतील युवा साहित्यिकांना अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. तर, बाल साहित्य पुरस्कारांसाठी  22 भाषेतील साहित्यकांची अकादमीच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि 50 हजार रूपये रोख असे आहे.
 
मराठी भाषेसाठी नवोदित तरूण कवयित्री विशाखा विश्वनाथ यांच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ या कविता संग्रहास साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. विशाखा यांचा हा पहिलाच कविता संग्रह आहे. 86 कविता असणाऱ्या त्यांचा हा संग्रह प्रकाशक गमभन यांनी प्रकाशित केलेला आहे. यामध्ये कवयित्रीने स्वत: सोबत भांडण करत स्वत: वर प्रेम करण्यापर्यंतचा प्रवास शब्दबद्ध केला आहे.

पुरस्कार जाहीर झाले असल्याचे कळल्यावर, ‘परीकथा खरी झाली असल्यासारखे जाणवत असल्याची प्रतिक्रिया दिली.’ कुटुंबात कोणाचाच वावर साहित्य क्षेत्रात नसल्याचे सांगून आपल्याला जे आवडते ते लिहिण्याचा हा प्रयत्न असल्याचे विशाखा यांनी सांगि‍तले. विशाखा यांचे शिक्षण फिल्म मेकिंगमध्ये झालेले असून फिल्म मार्केटिंगमध्ये त्या काम करतात. गोष्ट एका पैठणीची, अथांग, गुडबाय, पावनखिंड, झोंबिवली, चंद्रमुखी, शेर शिवराज, मी वसंतराव या सारख्या 50  नामांकित हिंदी मराठी चित्रपट आणि वेबसिरीजसाठी डिजिटल मार्केटिंग आणि कॉपीरायटिंग त्यांनी केलेलं आहे.
 
मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये  ख्यातनाम साहित्य‍िक डॉ. अक्षय कुमार काळे, बाबा भांड आणि प्रा. डॉ.विलास पाटील यांचा समावेश होता.
 
सुप्रसिद्ध बाल साहित्यकार व कथाकथनकार एकनाथ आव्हाड यांच्या ‘छंद देई आनंद’  या मराठी बाल कविता संग्रहास साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला. लेखक मागील 30 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देतांना श्री आव्हाड म्हणाले, ‘मागील 30 वर्षांपासून बालकांसाठी लिहित असलेल्या साहित्याचे या पुरस्कारामुळे चीज झाले.’
 
साहित्य‍िक श्री. आव्हाड हे मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी असे विविध प्रकारचे लेखन करतात. त्यांचे अक्षरांची फुले, आभाळाचा फळा, खरंच सांगतो दोस्तांनो, गंमतगाणी, तळ्यातला खेळ, पंख पाखरांचे, बोधाई, मज्जाच मज्जा, हसरे घर, सवंगडी, मजेदार गाणी, आनंद झुला, शब्दांची नवलाई असे बाल कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. मराठी भाषेसाठी तीन सदस्यीय निर्णायक मंडळामध्ये कैलाश अभुंरे, उमा कुलकर्णी आणि शफ़ाअत खान या साहित्य‍िकांचा समावेश होता.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor