रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 जुलै 2021 (12:25 IST)

भारावलेली माणसे...

आयुष्य जगताना रोजच्या जीवनात अनेक माणसे आपल्याला भेटतात काही माणसे नकळत आपल्या आयुष्यात सुगंध पसरवून जातात. आपण संस्कारित होण्याच्या दृष्टीने त्या व्यक्तींचा आपल्यावर प्रभाव पडलेला असतो. ही माणसे आगदी साधी भोळी असतात पण ती  आपले जगणे सुसह्य करण्याच्या दृष्टीने बरेच काही शिकवून जातात. अशी काही आठवणीत राहिलेली माणसे.

पेपरवाला........
असाच एकदा पुणे येथे मुलाकडे काही दिवसांसाठी वास्तव्यासाठी गेलो होतो. काही सात मजली व काही दहा
 मजली इमारतींचा समूह असलेल्या त्या ठिकाणी प्रत्येक मजल्यावर चार फ्लॅट्स होते. मुलाच्या शेजारी त्या सोसायटीचे सचिव रहात होते. एक दिवस शेजारून  मोठ मोठ्याने बोलण्याचे आवाज आल्याने दरवाजा उघडून पाहिले तर एक रहिवासी सचिव यांच्या बरोबर तावा तावाने वाद घालत असल्याचे दिसले. ते रहिवासी तक्रार करीत होते की, रोज सकाळी त्यांच्या फ्लॅट बाहेरील त्या जवळील जिन्यातील लाईट कोणीतरी मुद्दाम बंद करून जाते. त्या मुळे त्यांना गैर सोयीचे होते. काहीतरी तात्काळ बंदोबस्त करावा म्हणून ते गृहस्थ सांगत होते. तो विषय तिथे संपला. नंतर दोनतीन दिवसांनी मी सचिव यांच्याशी गप्पा मारताना विचारले की, काय झाले त्या परवाच्या तक्रारीचे? त्यावर त्यांनी सांगितलेला किस्सा मजेशीर व चकित करणारा होता. त्यांना चौकशीत दिसून आले की, सकाळी त्यांच्या इमारतीत वर्तमानपत्रे टाकणारा मुलगा वर्तमान पत्रे टाकून जाताना लाईट घालवून जातो. ते म्हणाले त्याला याबद्दल विचारले असता त्याने केलेला खुलासा सर्वांना शिकवून जाणारा असा होता. तो मुलगा रोज सकाळी आमच्या संपूर्ण रोड वर वर्तमानपत्रे टाकण्याचे काम करीत होता. तो हे काम सकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत करून कॉलेजला जात होता. वर्तमान पत्रे टाकताना जाताना त्याला नेहमी दिसून यायचे की, लख्ख सूर्य प्रकाश पडून चांगला उजेड असतानाही बाहेरील लाईट घालवले जात नाही. फार मोठ्या प्रमाणावर दिवे जळत राहतात. त्याला ही गोष्ट खटकल्याने तो वर्तमानपत्रे टाकून जाताना दिवे विझवून जातो. त्याचा खुलासा सचिव यांनी ऐकल्यावर त्याला रागवण्या ऐवजी त्याचे कौतुकच केले. तसेच सोसायटीच्या गॅदरिंग मध्ये त्याचा सत्कार करण्याचे ही ठरविले आहे. गप्पांच्या ओघात सोसायटीच्या सचिवांनी सांगितलेली ही गोष्ट छान काही सांगून गेली.
 
पाण्याच्या बाटली वाले काका.....
मुंबई येथे नोकरी करीत असताना रोज रेल्वेने प्रवास करताना रोज गर्दीतून उभे राहून जावे लागायचे. अश्या या गर्दीत एक काका दोन काखेत दोन मोठाल्या पिशव्या अडकवून डब्यात घुसत असत. आम्हा प्रवाश्यांना त्यांचे धक्के आवडत नसतं व सर्वजण कुरकुर करत असत. पण नंतर सर्वांच्या लक्षात आले की काका त्या पिशाव्यान मधुन गार पाण्याच्या बाटल्या घेऊन येतात. गाडीतील जमेल तसे पुढच्या पुढच्या डब्यात जावून गरजू तहानलेल्या प्रवाश्यांना फुकट पाणी देतात. मस्जिद बंदर स्टेशन आले की, गाडीतून उतरून आपल्या उद्योग धंद्याला जातात. जाताना सगळ्यांना टाटा बाय बाय करीत हसत जातात. सर्वांना ते परिचित झाले होते. त्यांचे नाव कधी समजले नाही. त्यांनी कधी प्रौढी मिरवली नाही. चेहरा मात्र आयुष्यभर आठवणीत राहिला. फळाची, स्तुतीची व कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्म करणे हे गीता तत्व ते खऱ्या अर्थाने जगत होते.
 
भेटलेला रिक्षावाला.....
हा रिक्षावाला मला कोल्हापूर येथे भेटला होता. शहरात प्रथमच आलो होतो. ज्या पाहुण्यांच्या घरी जाणार होतो ते दूरवर असल्याने रिक्षा करणे जरुरीचे होते. म्हणून रिक्षा चालकास विचारले. हा रिक्षावाला वेगळाच वाटला. बोलणे मधुर. वागणे अगत्याचे. त्याने मला कोल्हापुरात आला तर जरा फिरून जावा असेही सांगितले. वर पाहण्या योग्य काय आहे, कोठे छान खाण्याचे पदार्थ मिळतात तसेच जवळ बसने जाण्यासाठी कोणती ठिकाणे आहेत हे तर सांगितलेच पण जाताना कोल्हापुरी सुंदर चपला जरूर घेऊन जा असेही सांगितले. पाहुण्यांच्या घराजवळ पोहचल्यावर माझे बॅग सह सर्व सामान उचलून पाहुण्यांच्या घरात पहिल्या माळ्यावर पोहचवून दिले. योग्य भाडे घेऊन टीप नम्रपणे नाकारली. ही अनपेक्षित कृतीने भारावून जाऊन न राहून मी त्याला विचारलेच, बाबारे हे एव्हढे चांगले वागणे आजकालच्या दुनियेत कसे काय रे? त्यावर त्याचे उत्तर ऐकून मी चक्रावूनच गेलो. तो म्हणाला त्याचे काय आहे, आजकाल लोकांना काय झाले आहे ते समजत नाही. साध्या साध्या गोष्टीवरून वितंड वाद घालतात, अर्वाच्यभाषेत बोलतात, साध्या कारणांवरून भांडायला उठतात. बऱ्याच वेळेला मारामाऱ्या
 होतात. खून, हत्या यांचे प्रमाण समाजात वाढताना दिसते. हे सर्व पाहून मी स्वतःशी ठरविले की, आपण दिवसभर आनेक प्रवाश्यांना भेटतो. त्यांच्याशी चांगले वागले तर ते प्रसन्न होतील. त्यांचा मूड दिवसभर चांगला राहील. असे जर सगळेच वागले तर हे जग किती सुंदर होईल.
 
- सोशल मीडिया