गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : मंगळवार, 10 जानेवारी 2023 (12:03 IST)

अंगारकी संकष्टी चतुर्थी कथा

Ganesh Chaturthi
मुदगल पुराणात आणि गणेश पुराणात यासंबंधी असे कथानक आहे-
गणेश भक्त आणि वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंती नगरीत राहत होते. क्षिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती. तिला पाहून भारद्वाजांचे तेज द्रवीभूत झाले. ते पृथ्वीने धारण केले. त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता. तो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला ऋषींच्या स्वाधीन केला. त्यांनी त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेशमंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला. त्यानं एक सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न केलं.
 
गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्ट वर मागण्यास सांगितले. तो मुलागा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करावयाचे आहे. माझे नाव त्रेलोक्यात विख्यात व्हावे. आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो. यावर गणेशानं, आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो असं वरदान दिलं. `तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अकारकासारखा लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल, या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रद ठरेल.
 
तुला आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू अमृतपान करशील` असा वर त्याला गणेशानं दिला. तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं.
 
गणेशानं आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की, "ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवार ची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारकी ह्या नांवाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास २१ संकष्टी केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल. आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्याही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. ते ऋणमुक्त होतील".
 
ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे २१ संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन ही दिले गेले आहे.
 
व्रताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे. सायंकाळी पुन:स्नान करुन चंद्रोदय झाल्यावर गणेशाची षोडशोपचारे पूजन करावे. पूजेनंतर आरती म्हणून मंत्रपुष्प वाहून तुपात तळलेल्या 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन‍ किंवा पाटावर चंद्राची आकृती काढून त्यावर गंधफूल वाहून नमस्कार करावा. अंगारकी महात्यमाची पोथी वाचावी. मग गणेशाचं स्मरण करत भोजन करावे. व्रतासाठी शारीरिक शुद्धता पाहिजे. कोणत्याही प्रकारे सुतक, अडचण असल्यास फक्त उपोषण करुन गणेशस्मरण करावे व रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन 
करुन उपास सोडावा. पूजा विधी करु नये.
 
अंगारकी चतुर्थीला श्लोक म्हणून, चंद्रदर्शन करुनच उपवास सोडावा. 
गणेश अंगारकी श्लोक
गणेशाय नमस्तुभ्यं,
सर्व सिद्धि प्रदायक ।
संकष्ट हरमे देवं,
गृहाणार्घ्यम् नमोऽस्तुते ॥
कृष्णपक्षे चतुर्थ्यातु , सम्पूजितं विधूदये। क्षिप्रं प्रसीद देवेश,
अंगारकाय नमोऽस्तुते ॥
 
तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरुन दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पध्दत मात्र अवलंबू नये. कारण मुळातच बाप्पा ला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापि रुचत नाही. म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करुन उपवास सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच.
 
फलश्रुति
संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही संकटे नष्ट होतात, लग्ने जमतात, संतानप्राप्ती होते, कुटुंबातील व्यक्ती सुखरुप राहते. भांडणे मिटतात, परीक्षेत यश मिळते, पराक्रम घडतो, किर्ती प्राप्त होते, मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते. 21 संकष्टी चतुर्थी व एक अंगारकी यांचे फळ सारखेच मिळते.