सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (17:13 IST)

याला म्हणतात खरं प्रेम

चष्मा साफ करता करता एक वयस्कर काका आपल्या बायकोला म्हणाले : अगं, आपल्या जमान्यात मोबाइल नव्हते. 
काकू : हो ना ! पण बरोबर 5 वाजून 55 मिनिटांनी मी पाण्याचा ग्लास घेवून दरवाजात यायची आणि तुम्ही पोहचायचे. 
काका : मी तीस वर्षे नोकरी केली पण मला आजपर्यंत हे समजलं नाही की, मी यायचो त्यामुळे तू पाणी आणायचीस की तू पाणी आणायचीस त्यामुळे मी लवकर यायचो. 
काकू : हो. आणि अजून एक आठवतं की तुम्ही रिटायर व्हायच्या आधी तुम्हाला डायबीटीज नव्हता व मी तुमची आवडती खीर बनवायचे तेव्हा तुम्ही म्हणायचे की आज दुपारीच वाटलं होतं की आज खीर खायला मिळाली तर काय मजा येईल.
काका : हो ना .. अगदी. ऑफिस मधनं निघतांना मी जो ही विचार करायचो घरी आल्यावर बघतो तर तू तेच बनवलेलं असायचं. 
काकू  : आणि तुम्हाला आठवतं ? पहिल्या डिलीवरीच्यी वेळी मी माहेरी गेले होते तेव्हा मला कळा सुरू झाल्या होत्या. मला वाटलं हे जर माझ्याजवळ असते तर ? आणि काय आश्चर्य तासाभरात तर स्वप्नवत तुम्ही माझ्या जवळ होतात.
काका  : हो त्या दिवशी मनात विचार आला होता की तुला जाऊन जरा बघूयात.  
काकू : आणि तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून कवितेच्या दोन ओळी बोलायचे.
काका : हो आणि तू लाजून पापण्या मिटवायचीस व मी त्या कवितेला तुझा 'लाइक' मिळाला असं समजायचो.  
बायको  : एकदा दुपारी चहा करतांना मला भाजलं होतं त्याच दिवशी सायंकाळी तुम्ही बर्नोलची ट्यूब आपल्या खिशातनं काढून बोलले याला कपाटात ठेव. 
काका : हो..आदल्या दिवशीच मी बघितलं होतं की ट्यूब संपलीय. काय सांगता येतं कधी गरज पडेल ते? हा विचार करून मी ट्यूब आणली होती. 
काकू  : तुम्ही म्हणायचे की आज ऑफिस संपल्यावर तू तिथंच ये सिनेमा बघूयात आणि जेवण पण बाहेरच करूयात. 
काका : आणि जेव्हा तू यायचीस तर मी जो विचार केलेला असायचा तू अगदी तीच साडी घालून यायचीस.
काका काकूजवळ जावून तिचा हात हातात घेत बोलले : हो, आपल्या जमान्यात मोबाइल नव्हते पण आपण होतो.
काकू  : आज मुलगा आणि सून सोबत तर असतात पण गप्पा नाही तर व्हाट्सएप असतं. आपुलकी नाही तर टैग असतं. केमिस्ट्री नव्हे तर कॉमेंट असते. लव नाही तर लाइक असते. गोड थट्टामस्करीच्या ऐवजी अनफ़्रेन्ड असतं. त्यांना मुलं नकोत तर कैन्डीक्रश सागा, टेम्पल रन आणि सबवे सर्फर्स पाहिजे. 
काका : जाऊ दे गं! सोड हे सगळं. आपण आता व्हायब्रेट मोडवर आहोत. आपल्या बॅटरीची पण 1 च लाइन उरली आहे. 
अरे ! कुठं चाललीस ?
काकू  : चहा बनवायला. 
काका : अरे... मी म्हणणारच होतो की चहा बनव म्हणून. 
बायको  : माहिती आहे. मी अजूनही कवरेज क्षेत्रात आहे आणि मेसेजेस पण येतात. 
दोघेही हसायला लागले. 
काका : बरं झालं आपल्या जमान्यात मोबाइल नव्हते. 
-सोशल मीडिया