शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 2 जानेवारी 2019 (10:10 IST)

वास्तुशास्त्रानुसार कसे असासवे देवघर

घरात देवघराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवघर हे परमेश्वरासोबत सरळ संवाद साधण्याचे आपले हक्काचे ठिकाण असते. देवघरातच आपल्याला परम शांती मिळत असते. पूर्वी देवघर घराच्या आत नसायचे. घराच्या बाहेर एका बाजूला केले जात होते. त्याला सर्वजण मंदिर म्हणून संबोधत असत.
 
पण लोकसंख्या वाढू लागली तसे घराबाहेर असलेले मंदिर घराच्या आत आले. परंतु, वास्तुशास्त्रानुसार देवघर बांधताना त्याची दिशा व सजावट यांचा आधी विचार केला पाहिजे. त्याचे तसे नियोजन केले पाहिजे. त्यामुळे त्यापासून सकारात्मक लाभ होतात.
 
स्थळ : देवघर घरातील उत्तर-पूर्व दिशेच्या कोपर्‍यात असल्याने सुख, शांती, धन, संपत्ती व प्रसन्नता प्राप्त होते. देवघराच्या वरच्या मजल्यावर किंवा खालच्या मजल्यावर शौचालय अथवा स्वयंपाक घर नसावे. तसेच घरातील शिडीच्या खाली देखील देवघर बांधू नये. देवघर हे तळमजल्यावरच खुले व मोठे असायला पाहिजे.
 
देवाघरातील मूर्ती : देवघरात कमी वजनाच्या मूर्ती ठेवल्या पाहिजे. त्यांची दिशा पूर्व, पश्चिम, उत्तरमुखी असू शकते. मात्र, दक्षिणमुखी मुळीच नको. परमेश्वराचा चेहरा कुठल्याही वस्तूने अथवा फूल-माळांनी झाकता जाता कामा नये. तसेच परमेश्वराच्या मूर्ती भिंतीपासून साधारण एक इंचापर्यंत दूर ठेवल्या पाहिजेत. त्यांच्यासोबत आपल्या माता-पित्यांची छायाचित्रे देखील ठेवता कामा नये. भंगलेल्या मूर्ती देवघरातून काढून त्यांना नदीत विसर्जित केल्या पाहिजे.
 
दिवा : देवघरात दिवा पूजेच्या थाळीत देवाच्या समोर ठेवला पाहिजे. दिव्यात दोन जळत्या वाती पूर्व व पश्चिम दिशेने ठेवाव्यात.
 
देवघराचा दरवाजा : देवघराचा दरवाजा व खिडकी उत्तर किंवा पूर्व दिशेला पाहिजे. दरवाजा धातू अथवा पोलादाचा हवा. तो भिंतीमध्ये घट्ट केलेला असावा. तसेच देवघराचे छत हे उंच असावे.
 
इतर : धूप, अगरबत्ती व यज्ञकुंड देवघरात दक्षिण-पूर्व दिशेच्या कोपर्‍यात हवे. घरातील इतर वस्तू अथवा सौंदर्य प्रसाधने देवघरात ठेवू नये. पूर्व दिशेकडे तोंड करून पुजा केली पाहिजे. तसेच दागिने अथवा किंमती वस्तू देवघरात ठेवू नयेत.