शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By
Last Updated : सोमवार, 8 मार्च 2021 (08:20 IST)

वास्तुशास्त्राचा उल्लेख वेद, पुराणातही मिळतो

मनुष्याला जीवनात तीन प्रमुख बाबींची आवश्यकता असते. जीवनात शक्तीसाठी अन्न, निसर्गाच्या तापमानानुसार वस्त्र आणि निवासासाठी सुरक्षित घर. वरील तीनपैकी घर ही महत्त्वाची गरज आहे. त्याचप्रमाणे आपल्याला लाभलेले घर हे लाभदायी ठरावे, याचाही विचार आपण केला पाहिजे. म्हणूनच निवासस्थानाशी जोडलेल्या सर्व शास्त्रांचा अभ्यास स्थापत्य वेदात केला आहे. मनुष्याने आपल्या विकासाबरोबरच गरजेनुरूप या शास्त्राला विकसित केले आहे. या संबंधात वेद, पुराणात त्याचा उल्लेख आढळतो.
 
'वास्तू' हा शब्द संस्कृतमधील 'वास' या मूळ शब्दापासून तयार झाला आहे. याचा अर्थ मनुष्याच्या निवासासाठी योग्य भवन असा होतो. यासंबंधी जे नियम किंवा सिद्धांत सांगितले गेले, ते एका शास्त्रात बांधले आहेत. त्यालाच वास्तुशास्त्र असे म्हणतात. वास्तुशास्त्रावर लिहिलेल्या प्राचीन ग्रंथात एक ते बारा मजल्यापर्यंतच्या इमारतीचे वर्णन आहे.
 
इमारतीची लांबी, रूंदी, उंची कशी व किती असावी, आतील फर्निचर कसे असावे इत्यादीविषयी त्यात माहिती आहे. ऋग्वेदात घर बांधण्यासंदर्भातील आधुनिक माहितीही मिळते. त्यामध्ये एका ठिकाणी सहस्त्र स्थळांच्या भवनाचाही उल्लेख आहे. स्कंद पुराण, अग्नि पुराण, वायू पुराण, इत्यादींमध्येही वास्तुशास्त्राच्या प्रमुख तत्वांचे वर्णन आहे. मत्स्य पुराणात 18 वास्तू स्थापत्य शास्त्रज्ञांचा उल्लेख मिळतो.
 
भृगुमिर्वशिष्ठश्च, विश्वकर्मा, मयस्तया !
नारदोनग्नजिच्चैव, विशालदक्ष: पुरन्दर: !!
ब्रम्हाकुमांरो नन्दीश: रैनको भर्ग एवच !
वासुदेवा निरूद्धोश्व, तथा शुका बृहस्पति !!
अष्टाबशैते विख्याता, शिल्पशास्त्रोपदेशका: !!
 
मत्स्य पुराणात एका पूर्ण इमारतीत स्तंभ कोणत्या शैलीमध्ये असू शकतात याचे स्पष्ट वर्णन मिळते. अशाच शैलीचे वर्णन ग्रीक व रोमन वास्तू-साहित्यातही मिळते.
 
स्कंद पुराणात मोठ्या शहराच्या रचनेसंबंधी वर्णन केले आहे. गरूड पुराणात निवासयोग्य वास्तू आणि धार्मिक इमारतींविषयी माहिती मिळते. अग्नि पुराणात आवास गृह कसे असावे? याविषयी चर्चा केली आहे. नारद पुराणात विहीर, तलाव व मंदिर या वास्तू कशा बांधल्या पाहिजे याचे सविस्तर वर्णन आहे. वायु पुराणात डोंगरावर मंदिर तयार करण्याचे नियम सांगितले आहेत. 
 
जवळ जवळ चार हजार वर्षांपूर्वी लिहलेल्या ब्राह्मण ग्रंथातही वास्तुशास्त्राचा उल्लेख आहे. रामायण व महाभारत काळातही वास्तू विषयी ज्ञान होते. महाभारताच्या कथेनुसार श्रीकृष्णाने द्वारकानगरी वसविण्याची जबाबदारी विश्वकर्म्याकडे सोपविली होती. या नगरीची रचना वास्तुशास्त्राच्या नियमानुसार केली होती. पाण्यावर ही नगरी उभारण्यात आली होती. विशिष्ट काळानंतरती जलमय होईल, या हेतूनेच ती तशी बांधण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी समुद्रात त्याचे अवशेषही प्राप्त झाले होते. या प्रकारे इंद्रप्रस्थाचे निर्माण, रामायणात भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान तयार केलेला पूल व वज्रलेप (सिमेंट) चा उल्लेख मिळतो.
 
'सूत्र वाड्:मय' या संस्कृत ग्रंथात वास्तू विद्येचे विवेचन मिळते. यात वास्तू-कर्म, वास्तू-मंगल, वास्तू-होम, वास्तू-परिक्षा, भूमी-निवड, द्वार नियम, स्तंभ नियम, वृक्षारोपण, पदविन्यास आदींविषयीची तपशीलवार माहिती आहे. बौद्ध साहित्याचे बु्ल्लबग्ग, विनयपिटक, महाबग्ग, इत्यादी ग्रंथात वास्तुशास्त्रासंबंधी माहिती मिळते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रा‍त कपिशिर्ष, तल, कपाटयोग, सन्धि, तोरण, प्रतोती, विष्कंम, आयाम, उदय आदी वास्तुशास्त्राच्या पारिभाषिक शब्दाचा वापर केला आहे.'विश्वकर्मा प्रकाश' व 'समरांगण सूत्रधार' हे उत्तर भारतातील वास्तुशास्त्रीय ग्रंथ आहेत. दक्षिण भारतात 'मानसार' व 'मयमत' नामक दोन ग्रंथ सापडले आहेत. यात केवळ वास्तूनिर्मितीच नव्हे तर नगररचनेविषयीसुद्धा माहिती आहे. पिंडादिक प्रपंच, मुहूर्त चिंतामणी, मुहूर्त मार्तंड, वराहमिहिराचार्य प्रणित बृहत् संहिता, ज्योती प्रकाश, महर्षि कात्यायनाचे शल्ब सूत्र आदी ग्रंथही वास्तुशास्त्रावर प्रकाश टाकतात.
 
इसवी सन 1500 च्या पूर्वी अस्तित्वात असलेल्या हडप्पा मोहेंजोदडो नगराचे जे अवशेष मिळाले, त्यावरून नगरे किती व्यवस्थित वसविली जात, याची कल्पना येते. येथे कनिष्ककालीन बौद्ध स्तूप पण सापडला होता. पाटलीपुत्र नगराच्या मध्यभागी असेलेला मौर्य सम्राट चंद्रगुप्ताचा राजमहल विशालता व सुंदरतेचे उत्तम उदाहरण आहे. भगवान व्यंकटेश्वर तिरूपतीचे मंदिर वास्तुशास्त्राच्या सिद्धांतानुसार तयार केलेले असून त्याचे प्रवेशद्वार पूर्वेला आणि पन्हाळ उत्तर पूर्वेला आहे. हे मंदिर सर्वात श्रीमंत मानले जाते.
 
पृथ्वीची उर्जा, चुंबकीय क्षेत्र, गुरूत्वाकर्षण यांच्यापेक्षा सूर्य वास्तुशास्त्रातील प्रभावशाली घटक आहे. याशिवाय पाणी, अग्नी यांच्या आधारावरही वास्तुशास्त्राचे नियम बनविले आहेत. मनुष्याला सुखी ठेवणे हाच यामागचा हेतू आहे.
 
गे्ल्या काही वर्षांपासून वास्तुनिर्मिती आधुनिक व पाश्चात्य तंत्रज्ञानाच्या आधारे केली जाते. यात वास्तुशास्त्राचे नियम अजिबात पाळले जात नाहीत. त्याचा विपरित परिणाम झाला आहे. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घरे बांधल्यास त्याचा नक्कीच चांगला परिणाम होतो. यामागे काही चमत्कार, जादू किंवा कोणतीही दैवी शक्ती नाही. वास्तूची दिशा बदलून स्वत:ला निसर्गाच्या अनुरूप करणे हा त्याचा उद्देश आहे. त्यामुळे नक्कीच सकारात्मक परिणाम घडतो. वास्तुशास्त्राचे नियम पूर्णत: विज्ञानावर आधारीत आहेत. याचा अर्थ वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घरे बांधल्यास कोणीही सुखी, समृद्धी होऊ शकतो असे नाही. शेवटी त्याचे कर्तृत्व, परिश्रम त्याचबरोबर संस्कार, चरित्र, नियमितता, कर्म किंवा नशीब याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.