बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (07:50 IST)

वास्तुशास्त्रात विश्वकर्माचे महत्व !

निर्मिती सृष्टीच्या रचनेच्या कार्यात ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाचे महत्त्वाचे स्थान आहे, त्याप्रमाणेच विश्वकर्म्यालाही महत्त्व आहे. देवतांच्या वास्तूंचा शिल्पकार म्हणून संपूर्ण ब्रह्मांडात विश्वकर्म्याची ख्याती आहे. ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या तत्त्वांच्या संयोगाने विश्वकर्मा याची निर्मिति झाली.
 
महत्त्व : विश्वकर्मा त्याच्या कृतीतून कला व बुद्धि यांच्या योग्य संयोगाने सात्त्विक वास्तूंची रचना करून ईश्‍वरप्राप्‍ती करण्याचा मार्ग दाखवून देतो.
 
कार्य उत्त्पत्ती
देवतांच्या महालांची निर्मिति करणे : विश्वकर्माने प्रथमच सात्त्विक वास्तूंची निर्मिती केली. यामध्ये त्याने सर्वप्रथम सगुणलोकामध्ये उच्च देवतांच्या महालांची निर्मिती केली. त्याने निर्मिलेले श्रीलक्ष्मी, श्रीकृष्ण, श्रीराम व मारुति यांचे महाल विलक्षण सुंदर आहेत. त्यानंतर त्याने स्वर्गलोकातील इंद्र व इतर देवता यांच्या महालांची निर्मिति केली. त्रेतायुगाच्या प्रारंभी त्याने लंकेत शिव व पार्वती यांच्यासाठी `लंकापुरी' या सुवर्णनगरीची निर्मिती केली. त्यामध्ये त्याने शिव व पार्वती यांच्यासाठी सुवर्णमहालाची रचना केली होती. प्रत्येक देवतेच्या महालाची रचना, शिल्पकला व नक्षीकाम निराळे आहे.
 
मंदिरांची निर्मिति करणे : शिव, देवी व इतर देवता यांच्या प्राचीन मंदिरांची निर्मिती विश्वकर्म्याद्वारेच झाली आहे. यामध्ये बर्‍याच मंदिरांवरील नक्षीकाम व शिल्पाकृती यांचे देवतांच्या महालांशी साधर्म्य आहे. विश्वकर्माने त्या वेळी मंदिराचे शिल्पकाम व रचना करणार्‍या कारागिरांना सूक्ष्मातून मार्गदर्शन केले होते. त्यामुळे सात्त्विक मंदिरांची निर्मिती झाली.
 
स्थिती विश्वकर्माने ज्या वास्तूंची निर्मिति केली, त्या वास्तूंची संपूर्ण जबाबदारी त्याच्याकडेच असते. त्या वास्तूंची सात्त्विकता शेवटपर्यंत टिकून ठेवणे, त्या वास्तूंचे संरक्षण करण्यासाठी विविध वास्तुदेवतांची निर्मिति करणे, त्यांना वास्तूच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविणे, हे कार्य विश्वकर्माच करतो. त्याचप्रमाणे इतर देवतांना वास्तुशास्त्राचे ज्ञान देणे, हे त्याचे कार्यही सुरू असते.
 
वास्तूशास्त्राची निर्मिती करणे : विश्वकर्माने ब्रह्मदेवाच्या साहाय्याने सात्त्विक वास्तूंची निर्मिति करण्यासाठी वास्तूशास्त्राची निर्मिति केली. वास्तूशास्त्राप्रमाणे वास्तूची रचना केल्यास वास्तु सात्त्विक बनते. यामध्ये जागा, दिशा, वास्तूचे बांधकाम करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, उंची, वास्तूची रंगसंगती, वास्तूचे अंतर्सौंदर्य या सर्वांचा समावेश असतो. त्यामुळे वास्तूमध्ये कोणतेही दोष रहात नाहीत. वास्तूशास्त्रानुसार वास्तु बांधल्यास तिची सात्त्विकता वाढते व वास्तूमध्ये उच्च देवतांच्या लहरी ग्रहण करण्याची क्षमता येते. सात्त्विक वास्तूमध्ये उच्च देवतांच्या लहरी खेळू लागतात. वास्तूचे संरक्षण करणारा वास्तुपुरुष हा उच्च देवतांच्या लहरींमुळे संतुष्ट होतो. तसेच या लहरींमुळे वास्तूचे वाईट शक्‍तींपासून रक्षण करण्यासाठी त्याला बळ प्राप्‍त होते.
 
साधना करणारे जीव वास्तूत रहात असल्यास होणारे परिणाम
वास्तूचे वातावरण जास्त काळ सात्त्विक रहाण्यास मदत होते.
वास्तूचे वातावरण सात्त्विक राहिल्यामुळे वास्तुपुरुष प्रसन्न होतो व तो वास्तूचे वाईट शक्‍तींपासून रक्षण करतो.
वास्तू सात्त्विक झाल्यामुळे वास्तूमध्ये उच्च देवतांच्या लहरी जास्त प्रमाणात आकृष्ट होऊ लागतात. साधक जिवांनी भावपूर्ण साधना केल्यास अशा वास्तूला देवता सूक्ष्मातून भेटी देतात.
सात्त्विक वास्तूच्या भोवती ईश्‍वर सूक्ष्मातून संरक्षककवच तयार करतो.
 
सात्त्विक वास्तूंची निर्मिती म्हणजे एक अभूतपूर्व कार्य होय ! : विश्वकर्मानेसात्त्विक वास्तूंची निर्मिति केली आहे. त्याने विविध वास्तुशिल्पांची निर्मिति केली आहे. यामध्ये मंदिर, घर व इमारत यांसारख्या वास्तूंच्या निरनिराळया वास्तूशिल्पांच्या आकृत्या आहेत.
 
शापित शिवगण, हीच पृथ्वीवरील स्थानदेवतांची वेगवेगळी रूपे : सेवेमध्ये शिवगणांकडून काही चूक झाल्यास भगवान शंकर किंवा इतर उच्च देवता कनिष्ठ शिवगणांना पंचतत्त्वात जाऊन स्थानदेवतेच्या रूपात सामील होऊन कार्य करण्याचा शाप देतात. शापित शिवगण पंचतत्त्वात कार्य करण्यासाठी येतात, तेव्हा ते त्यांच्या मूळ स्वभावाच्या दुप्पट तामसिक व राजसिक होतात. यामुळेच शिवगण पंचतत्त्वात प्रकट राहून स्थानदेवतेचे कार्य सांभाळू शकतात. यांना शापासाठी उ:शाप नसतो. त्यांनी स्वत:च साधना करावयाची असते.