मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (09:13 IST)

वास्तुशास्त्राप्रमाणे ब्रह्मस्थळाचे महत्त्व

जमिनीच्या मधल्या भागाला ब्रह्मस्थळ म्हणतात. 8 पद वास्तुविन्यासात मध्यभागी पद आणि बाहेरची 8 पदे ब्रह्मदेवतेला दिली गेली आहेत. ब्रह्मस्थळ हे जमिनीची, घराची शुद्ध ऊर्जा मिळवण्याची जागा आहे. म्हणूनच ग्रंथात त्याला उघडे ठेवण्यास सांगितले आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा स्तंभ, कॉलम, दरवाजा, देवाघरं, शौचालय अशा कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये.
 
ब्रह्मस्थळाचे महत्त्व :
ब्रह्मस्थळाचे महत्त्व असेही सांगितले आहे की, सृष्टी निर्मात्याच्या रूपात ब्रह्मदेव असून सगळ्या ऊर्जेचा प्रारंभ त्यापासूनच होतो. म्हणून ब्रह्मस्थळाच्या पूर्वेला इंद्र, उत्तरेला कुबेर, नैऋत्येला नैऋत्ती, वायव्येला वारा अशा ऊर्जेचीच ही रूपे आहेत.
 
ब्रह्मस्थळाला सूर्याच्या संबंधात सांगायचे तर, प्रकाशासमोर भिंग घरून त्या साहाय्याने कागद जाळता येतो. कारण ते सूर्याच्या ऊर्जेचेच एक रूप आहे. बरोबर त्याचप्रमाणे ब्रह्मस्थळ पण सूर्याच्या ऊर्जेचे एक रूप आहे. म्हणून घरात त्याला मोकळे व स्वच्छ ठेवावयास हवे.
 
ज्याप्रमाणे चेंडू वर फेकताना सगळी ऊर्जा त्याच्या केंद्रात साठते त्याप्रमाणे जमिनीची किंवा घराची ऊर्जा त्याच्या केंद्रभागी साठते. पृथ्वी गोल असूनही ती स्वतः भोवती फिरते. जमीन तर पृथ्वीचेच रूप आहे. त्यामुळे पृथ्वीप्रमाणेच त्याची ऊर्जा केंद्रभागी आहे. सगळ्या ग्रंथात ब्रह्मस्थळाविषयी वेगवेगळे परिणाम सांगितले आहेत.
 
ब्रह्मस्थळाचे प्रकार :
 
जमिनीचे ब्रह्मस्थळ
घराचे ब्रह्मस्थळ
 
घर अशा प्रकारे बांधावे की जमिनीचा किंवा बांधलेल्या घराचा मध्य (ब्रह्मस्थळ) उघडा हवा. हे चांगले आहे त्याला कोणत्याही भिंतीने, कॉलम, दरवाज्याने बंद करू नये, जर दोन्ही ब्रह्मस्थळ पिडीत असतील तर त्या स्थान विशेषानुसार फळ मिळते.
 
ब्रह्मस्थळ काढण्याची पद्धत
1. वर सांगितल्याप्रमाणे जामिनाचे उभे व आडवे (9x9) भाग करून त्याचा मध्य व बाहेरचे 8 भाग ब्रह्मदेवतेचे असतात.
2. वास्तुपदविन्यासाशिवाय ब्रह्मस्थळाचे ठिकाण काढायचे असेल तर चारी उपदिशांपासून दोन रेषा काढल्यावर त्या ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात त्या ठिकाणी ब्रह्मस्थळ असून त्याच्या बाजूचा भाग (मुख्य जमिनीच्या क्षेत्रफळाच्या 1/3 केंद्रभाग) मोकळा सोडावा.
 
याच पद्धतीला दुसऱ्या तऱ्हेने समजून घेता येईल. जमिनीच्या चारही कोनांना नावे द्या. अ, ब, क, ड त्या चार बिंदूंपासून म्हणजे, अ पासून क पर्यंत व ब पासून ड पर्यंत रेषा काढा. त्या एकमेकींना ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूलाच ब्रह्मस्थळ म्हणतात.