शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By
Last Modified: रविवार, 1 मार्च 2020 (10:15 IST)

उच्चभ्रू महिलेच्या मध्यम वर्गीय भावुक स्वभावाची सुंदर कथा

"Neha,  मी  आज दुपारी दादरला जाऊन येणारे. "माझं  वाक्य पूर्ण व्हायच्या आत नेहा म्हणाली, "आई, ओला, उबेर किंवा टॅक्सिने जा हं .. "
सोफ्यावर पेपर वाचत बसलेला नवरा हसून लगेच  म्हणाला. "Neha,  ती मध्यमवर्गीय आहे. ती ट्रेन किंवा बस नेच जाणार"
"अरे, साठी उलटून गेली तरी ट्रेन, बसने फिरू शकते याचं खरं तर कौतुक करायला हवं तुम्ही. "माझी काटकसर कसली बघता. "मी  पण हसण्यावर नेलं ते. "काहीतरी खायला करून ठेवीन म्हणजे अथर्व शाळेतून आल्यावर त्याची पंचाईत नको व्हायला."
"आई, अहो एक दिवस आणेल की काही तरी पार्सल.. बाबाही enjoy करतील. Burger किंवा वडापाव पाव. "
"Neha, अबब एवढाले पैसे खर्च करायचे ते junk फूड खायला !!! "तुझ्या मध्यम वर्गीय सासूला पटणार का ? "
नवऱ्याने मला बोलायची संधी नाहीच सोडली. 
"बरं चालेल" असं म्हणून मी विषय संपवला. 
"मुलगा त्याच्या बेड room मधे अजूनही लॅपटॉप वर काम करत होता."
"Sujit,  आज ऑफिसला नाही जायचं""अगं आज गाडी गॅरेजमधे दिलीय. कुठे ते टॅक्सी शोधत बसा. "वर्क फ्रॉम होम" करतोय. बाय the  way तू आज दादरला कशासाठी जातेयस? "
आता याला का जातेय हे सांगितलं तर परत माझ्या मध्यमवर्गाचा उद्धार होईल, म्हणून मी "काम आहे "एवढं मोघम उत्तर दिलं. पूर्वीच्या आमच्या दादरच्या शेजारी, मालतीकाकू घराला हातभार लावायला, त्यांच्या भावाने कोकणातून पाठवलेले पदार्थ विकतात. दुकानातून घ्यायचं तर मी त्यांच्याकडे जाऊन आणते तेवढीच त्या भावंडाना मदत. पण हे आमच्या घरच्यांच्या पचनी पडणं जरा कठीणच. म्हणून मी सुजितला काही बोलले नाही.. 
 
 
दुपारी गर्दीची वेळ टळून गेल्यामुळे आरामात ट्रेनने दादरला गेले. इकडं तिकड्ची विचारपूस केली, गप्पा टप्पा केल्या आणि चहा पिऊन बस स्टॉपवर आले. याच्यासाठी घे,  त्याच्यासाठी घे (टिपिकल मध्यम वर्गीय !!!) असं करताना सामान अंमळ जडच झालं. कष्ट उपसायचे असा काही हव्यास नव्हता माझा. मी टॅक्सी करायचं ठरवलं. 
नकळत स्टॉपवर उभ्या असलेल्या दोघी तिघींना विचारलं, "पार्ल्यापर्यंत जातेय. कोणाला वाटेत सोडू का" 
"टिपिकल मध्यमवर्गीय "हा मीच मला taunt  मारला बरं का. अरे एवीतेवी  दोनशे रुपये खर्चच करायचे तर एकटीसाठी कशाला.. नाही का .. माझं मलाच हसू आलं. घरी जर हे सांगितलं तर सुजितचा तर स्फोटच होईल. माझं फुटकळ समाज कार्य  कसं अंगलट येऊ शकतं याच्यावर हिरीरीने चर्चा होईल. "काळ बदललाय, पण तरीही सतत अविश्वासाचे चष्मे घालून का रे वावरता. चांगुलपणा अजूनही येतो अनुभवायला.  "हे माझं म्हणणं मोडीत काढलं जाईल किंवा मध्यमवर्गीय विचारात त्याची गणना होईल. हे मला माहित होतं. 
 
मी घरी आले तर मस्त MacD च्या पार्सल वर तिघांनी ताव मारल्याची वर्दी ओट्यावरच्या पसाऱ्याने दिली... 
सवयीनुसार take away चे कंटेनर धुऊन पुसुन कपाटात ठेवले. कामवाल्या बाईंना, मावशींना, पदार्थ घालून द्यायला उपयोगी पडतात. "टिपिकल मध्यमवर्गीय" वागणं. !!! 
 
सोफ्यावर जराशी टेकले आणि मनात विचार आला "मध्यमवर्ग "हा  स्तर जरी पैशाची आवक" या वरून पडला असेल तरी मध्यम वर्गीयांचे विचार, वागणूक, संस्कार यात खूप श्रीमंती आहे. आज पैशाची थोडी उब मिळाली, सुबत्ता आली म्हणून हे संस्कार पाळायचे नाहीत हे कितपत योग्य आहे? चालत जाता येण्यासारखं अंतर असेल,  किंवा बस ट्रेननी जाणं सोयीचं असेल तर परवडतंय म्हणून टॅक्सिने जाणं जर मला चैन वाटत असेल तर त्यात मध्यमवर्ग कुठे आला? काटकसर कुठे आली? पैशाची नाहक उधळमाधळ नको ह्या संस्काराची जपणूक आहे यात. सहजपणे कोणाला मदत करणं, वस्तू जपून वापरणं, आपुलकीने कोणाशी वागणं, गरजा मर्यादित ठेवणं, उच्च राहणीमान ठेवूनही दिखाऊपणा न करणं या वागण्याचा संबंध आजची पिढी पैशाशी का जोडू पहाते. हे वागणं  टिपिकल मध्यमवर्गीय म्हणून त्याची खिल्ली का उडवते. हे आकलनाच्या पलीकडे आहे आणि न पटणारे आहे. 
 
आजकालच्या आत्मकेंद्रित पिढीला या कशातही रस वाटत नाही. एकमेकांच्या संपर्कात राहणं, जुडलेलं राहणं, थेट भेटणं, हे मध्यमवर्गीय का वाटावं या पिढीला? "आई, आजकाल असं नाही आवडत लोकांना.. त्यांना त्यांची अशी space  हवी असते "असं म्हणत आपसातल अंतर वाढवणं हे उच्चभ्रू ?? माझ्या मध्यम वर्गीय विचारात न बसणारं आहे हे !!!  आपल्याला हवं तसं वागायची मोकळीक आहे ना आपल्याला. मग मनातल्या मनात तरी कशाला चर्चा करायची.. 
 
मी मध्यमवर्गीय आहे याचा मला अभिमान आहे ना.. मग झालं की. !! असं म्हणून सगळ्यांसाठी फक्कड चहा करायला स्वयंपाक घरात घुसले. 
 
-नीलिमा जोशी