'स्त्री' म्हणजे फेअर सेक्स!
'स्त्री ' म्हणजे फेअर सेक्स, नाजूक उन्हाने कोमेजणारी, गजगामिनी अशा रूढ कल्पनांचा पगडा अजूनही आमच्या शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात दिसतो. शक्ती लागणारी, शारीरिक श्रम ज्यात आहेत अशी पुरुषीपणा निर्माण करणारी कामे स्त्रियांनी अजिबात करू नयेत असे, आमचे पुरुष आजही म्हणतात. समाजजीवनातील स्त्रीची भूमिका आदर्श गृहिणी, आदर्श पत्नी, माता ही आहेच पण या व्यतिरिक्त तिला काय व्हावेसे वाटते याला फारसे महत्त्व दिलेच जात नाही.
निसर्गानुसार मुली वयात येतात, प्रेमात पडतात आणि आपला जीवनसाथी निवडतात, अथवा वडील मंडळी त्यांचा जीवनसाथी शोधतात. परंतु हे जे घडते, याबरोबरच अन्य काही आपण घडवावे असेही प्रत्येक मुलीस वाटते. मुलींना काय व्हावेसे वाटते. याचा शोध घेताना सामाजिक संस्कारांचा त्या इच्छेला बसणारा पायबंद आमच्या शिक्षकांच्या उत्तरात प्रतिबिंबित झाला आहे.
चाळीस-पन्नास वर्षाहून अधिक काळ स्वातंत्र्य उपभोगणार्या या देशातील शिक्षकास स्त्रीची भूमिका आदर्श गृहिणी, पत्नी व माता यापेक्षा अधिक आहे, नव्हे ती असलीच पाहिजे याची जाणीव नसेल तर, आजच्या माध्यमिक शाळेत शिकणार्या बहुसंख्य मुली आपल्या गळ्यात फक्त मंगळसूत्र पडण्याचीच वाट पाहत बसतील. जे सुप्त आहे त्याला अंकुरित करणे, जे अंकुरित आहे त्याला विस्तारित करणे जे विस्तारित आहे त्याला खोली प्राप्त करून देणे हे शिक्षकाचे काम आहे. आजच्या माध्यमिक शाळांतील अनेक मुलींच्या मनात आपण कोणीतरी व्हावे याबद्दलचे एक स्वप्न सुप्तावस्थेत आहे. समाजजीवनातील स्त्रीची भूमिका केवळ गृहिणी, पत्नी, माता नसून ती यापेक्षा अधिक जबाबदारीची असल्याची जाण शिक्षकात नसेल तर आमच्या अनेक मुलींची 'कोणीतरी' होण्याची स्वप्ने अंकुरित होणे कठीण होईल. इंदिरा संतांनी आपल्या 'झोका' या कवितेत म्हटले आहे -
झोका चढतो उंच उंच
मला थांबता थांबवेना
गुंजेएवढे माझे घर
त्याची ओळख पटेना!
विकसनाच्या खूप उंच झोक्यावर चढून खुली हवा चाखलेल्या स्त्रीला गुंजेएवढ्या घरात स्वत:ला दडपून राहणे कसे आवडेल? आणि ते आवडत नाही म्हणून ते गुंजेएवढे घर थोडे उलटेपालटे होणारच ना? असे होईल या भयाने स्त्रीला परंपरागत साच्यात कोंबण्याचा प्रयत्न केल्यास तो प्रयत्न फार काळ यशस्वी होणार नाही. स्त्रीची जागृत अस्मिता तिच्या इच्छा आकांक्षाची उभारी, तिच्या व्यथांचे विस्फोट यांच्यापुढे आजची स्त्री गडकर्यांनी सिंधू होऊ शकणार नाही, हे ओळखून उद्याच्या स्त्रियांच्या आजच्या शिक्षकांनी आपले चष्मे पुसून साफ करायला नकोत काय?