बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (07:37 IST)

57 टक्के लोकांनी मुंबई सोडली, पण का वाचा सविस्तर

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात झाला. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊन काळात नागरिकांना कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला याचा कुटुंब सर्वेक्षणावर आधारीत ‘मुंबईत कोविड-19 चा परिणाम-उपजिविका, आरोग्य शिक्षण, घरे आणि परिवहन याबाबत नागरिकांचे सर्वेक्षण’ हा प्रजा फाऊंडेशनने तयार केला आहे. या आहवालात लॉकडाऊन काळात मुंबईकरांना कसा सामना करावा लागला याचा लेखेजोगा मांडण्यात आला आहे.
 
प्रजा फाऊंडेशने आपला हा अहवाल गुरुवारी (दि.28) प्रकाशित केला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शहराच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवर खूप मोठा प्रभाव पडल्याचे जाणवल्याने या प्रभावाचे नेमकेपणाने विश्लेषण यामध्ये करण्यात आले आहे. उपजिविका, आरोग्य, शिक्षण, घरे आणि परिवहन या महत्त्वाच्या घटकांबाबत प्रजाने हंसा रिसर्चच्या सहाय्याने केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष या आहवालात सादर केले आहे, असे प्रजाचे संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता यांनी सांगितले.
 
57 टक्के लोकांनी काम गेल्याने मुंबई सोडली
कामाच्या शोधात संपूर्ण देशातून लोक मोठ्या प्रमाणात मुंबईत येतात. मात्र कोरोना महामारीच्या काळात मुंबईबाहेर जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे होते. लॉकडाऊन काळात मुंबईबाहेर स्थलांतरित झाल्याचे सांगणाऱ्या एकूण 23 टक्के उत्तरदात्यांपैकी 57 टक्के लोकांनी काम गेल्याने मुंबई सोडत असल्याचे सांगितले आहे. त्यापैकी 80 टक्के सामाजिक-आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातील नागरिक असल्याची माहिती प्रजाने दिली.
 
36 टक्के लोकांच्या पगारात कपात
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे नोकरीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे प्रत्येक तीन व्यक्तीपैकी दोघांनी सांगितले आहे. नोकरीवर प्रतिकूल प्रभाव पडला असे म्हणणाऱ्या लोकांची संख्या 36 टक्के आहे तर 28 टक्के लोकांचा पगार कमी केला गेला. 25 टक्के लोकांनी बिनपगारी काम केले तर 13 टक्के लोकांनी जादा तास काम केलं किंवा कामाचा भार वाढल्याचे प्रजाचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी सांगितले.
 
58 टक्के आरोग्य सेवा बंद
कोरोना रुग्णावर उपचार करण्याचा सर्वाधिक भार सरकारी दवाखान्यांनी उचलला. यापूर्वी प्रकाशित केलेल्या ‘आरोग्यविषयक सध्यस्थिती 2020’ या आहवालात नमूद केल्याप्रमाणे, लॉकडाऊन काळात कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांच्या कारणानेही कित्येक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन काळात कोरोना व्यतिरिक्त इतर आरोग्य सेवा मिळणे कठीण झाल्याचे 36 टक्के जणांनी सांगितले. याची दोन प्रमुख कारणे म्हणजे, इतर उपचारासाठी कर्मचारी-डॉक्टर उपलब्ध नसणे (70%), आरोग्य सेवा बंद झालेली असणे (58%) असे मेहतांनी सांगितले.
 
नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य खालावले
लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका तर बसलाच शिवाय मानसिक आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या. अलगीकरणामुळे आलेला शारीरिक व मानसिक ताण आणि काम जाणे, पगार न मिळणे, स्व-विलगीकरण इत्यादी कारणामुळे मानसिक स्वास्थ्य खालवल्याचे दिसून आले. यामुळे नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्याचा मुद्दा समोर आला. लॉकडाऊनमध्ये चिंता व ताण वाढल्याचे 60 टक्के लोकांनी सांगितले. तर 84 टक्के लोकांनी आपण आपल्या मानसिक आरोग्याविषयी कोणाला काहीही सांगितले नसल्याचे सांगितले.
 
ऑनलाईन शिक्षणामुळे 43 टक्के मुलांना डोळ्यांच्या समस्या
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिक्षणाची पद्धती बदलली. मुलांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. याचा परिणाम मुलांच्या शारीरिक हालचाली नसल्याने मुलांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे 63 टक्के पालकांनी म्हटले आहे. जसे की, डोळ्यांच्या समस्या (43%), चिडचिडेपणा (65%). त्यामुळे अनेक पालकांनी (62%) ऑनलाईन शिक्षण थांबवून प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याची मागणी केली.