मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (16:01 IST)

कोरोना केंद्रात लसीकरणासाठी गेलेल्या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

वसई विरार महानगर पालिकेच्या नालासोपारा येथील आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गेलेल्या एका ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. उन्हामुळे चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती पालिका डॉक्टरांनी दिली आहे. मात्र या केंद्रात रुग्णवाहिका तसेच प्राथमिक उपचाराची सोय नसल्याने मृत्यू झाल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला आहे.
 
शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास नालासोपारा पश्चिमेच्या पाटणकर परिसरात राहणारे हरीशभाई पांचाळ (६३) याच परिसरातील महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रात लसीकरणासाठी गेले होते. ते नाव नोंदणी करण्यासाठी रांगेत उभे राहिले असता अचानक चक्कर आली आणि खाली पडले. त्यांना जवळच्या पालिका रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
 
यावेळी पांचाळ यांच्यासोबत रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांनी माहिती दिली की, लसीकरण केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती, जी रुग्णवाहिका होती ती केवळ डॉक्टरांना ने आण करण्यासाठी होती, त्यात ऑक्सिजनची कोणतही सुविधा नव्हती. त्यामुळे रुग्णवाहिका चालकाने रुग्णाला नेण्यास नकार दिला. या ठिकाणी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते निमेश वसा यांनी मध्यस्थी करून रुग्णवाहिकेतून पांचाळ यांना नेण्यासाठी भाग पाडले. मात्र पांचाळ यांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला.