बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (18:14 IST)

पाकिस्तानी मुलाला ऑनलाइन गर्लफ्रेंडनं मुंबईला बोलावलं, त्यानं बॉर्डर पार केली आणि...

प्रेम माणसांना जोडतं, मनं जोडतं असं म्हणतात. पण कोणताही विचार न करता प्रेम केलं आणि प्रेमात पडून निर्णय घेतले तर तेच प्रेम भर वाळवंटात नेऊन सोडतं...
पाकिस्तानात बहावलपूर इथे राहणाऱ्या 21वर्षीय मोहम्मद अहमर याची गोष्ट अशीच काहीशी. भारतात राहणाऱ्या प्रेयसीला भेटण्यासाठी मोहम्मदने बेकायदेशीर पद्धतीने भारत-पाक सीमारेषा पार केली.
पण या प्रयत्नात प्रेयसीला भेटण्याऐवजी तो वाळवंटात पोहोचला. भारतीय लष्कराने त्याला पकडलं, त्याची चौकशी सुरू आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते, अटकेच्या वेळी मोहम्मदकडे पाचशे रुपये मिळाले. कोणतंही शस्त्र मिळालं नाही. लष्करी अधिकाऱ्यांना एक प्रेमकहाणी ऐकायला मिळाली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहम्मदची मुंबईतल्या एका मुलीशी ओळख झाली. बहावलपूरमधल्या मोहम्मदच्या नातेवाईकांनी सांगितलं की, मोहम्मद आणि त्या मुलीची ओळख झाली आहे आणि ते तासनतास बोलत असतात.
व्हिसासाठी अर्ज केल्याचं मोहम्मदने भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांना सांगितलं. पण हा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी सीमेपार जाण्याचा निर्णय घेतला.
 
'जसं काय मुंबई सीमेलगतच आहे'
श्रीगंगानगरचे पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी यासंदर्भात माहिती सांगितली. ते म्हणाले, "चौकशीदरम्यान कळलं की मोहम्मद मुंबईतल्या एका मुलीच्या संपर्कात होता. त्याचं तिच्यावर प्रेम आहे. मुलीने त्याला मुंबईला यायला सांगितलं. सीमा ओलांडून मुंबईला ये असं ती मुलगी म्हणाली."
"त्याला असं वाटलं की सीमा ओलांडली की, मुंबईला पोहोचू जसं काय मुंबई सीमेपलीकडेच वसलं आहे. जिथून मोहम्मद पाकिस्तानातून भारतात आला ते ठिकाण म्हणजे अनुपगढ. तिथून मुंबई 1400 किलोमीटर दूर आहे."
स्थानिक एसएचओ फूल चंद यांनी मोहम्मदला पकडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. 4 डिसेंबरच्या रात्री बहावलपूरच्या जवळ वाळवंटात राजस्थानच्या जिल्ह्यात अनुपगढ परिसरात भारत-पाकिस्तान सीमारेषा ओलांडल्याप्रकरणी मोहम्मदला अटक करण्यात आली.
एसपी आनंद शर्मा यांनी सांगितलं की, "सीमा ओलांडल्यानंतर लगेचच बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी त्याला पाहिलं. सुरक्षा यंत्रणांनी त्याला आमच्या हवाली हो असं सांगितलं. त्याने ते मान्य केलं".
 
निर्दोष आढळल्यास परत पाठवण्यात येईल
एसएचओ फूल चंद यांनी सांगितलं की, "मोहम्मदची सविस्तर चौकशी करण्यात येईल. त्यांनी सांगितलेल्या दाव्यांची गोष्टींची सत्यासत्यतेची पडताळणी करण्यासाठी संयुक्त चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीने मुंबईला भेट दिली. मोहम्मदचं प्रेम असलेली ती मुलगी खरंच आहे का याचा समितीने शोध घेतला. प्रेमाचा बहाणा करून भारतात बेकायदेशीर पद्धतीने शिरण्याचा मोहम्मदचा प्रयत्न आहे का याचा शहानिशा करण्यात येणार आहे".
मोहम्मदचं प्रेम असलेल्या मुलीशी चौकशी समितीचा संपर्क झाला आहे, असं पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितलं.
 
मोहम्मदप्रकरणी देशविरोधी घडामोड नाही, असं आम्हाला बहुताशांने वाटतं आहे. पण केंद्रीय एजन्सी स्वतंत्र चौकशी करत आहेत.
 
मोहम्मद निर्दोष असल्याचं सिद्ध झालं तर बीएसएफ आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्यात बैठक होईल.
 
पोलीस अधीक्षक शर्मा यांनी सांगितलं की, "मोहम्मद आमचा आहे हे पाकिस्तानने मान्य केलं तसंच त्याने सीमा पार केल्याचं त्यांनी मान्य केलं तर मोहम्मदला परत पाठवण्यात येईल. तसं झालं नाही तर दिल्लीतल्या पाकिस्तानच्या उच्चायुक्ताला याची कल्पना देण्यात येईल. जेणेकरून ते याप्रकरणाचं पुढे काय करायचं ते ठरवू शकतील."
 
मोहम्मदची प्रेयसी कोण?
मोहम्मदचं प्रेम असलेली ती मुलगी कॉलेजमध्ये शिकते. मोहम्मदशी ती बोलत असे पण त्याच्या बोलण्याप्रती ती एवढी गंभीर नव्हती.
 
त्या मुलीने तपाय यंत्रणांना सांगितलं की, तिने गंमतीत मोहम्मदला मुंबईत यायला सांगितलं पण तो इथे येईल असं तिला कधीच वाटलं नाही.
मोहम्मदचे एक नातेवाईक अर्शद यांनी पाकिस्तानमधील पत्रकार इम्रान भिंडर यांना सांगितलं की, पाकिस्तानात मोहम्मदचे वडील आजारी असतात. प्रदीर्घ काळापासून ते अंथरुणाला खिळले आहेत. त्याची आई मोहम्मदला पाहण्यासाठी आतूर झाली आहे. मोहम्मदचे दोन भाऊ आजूबाजूच्या भागात मोलमजुरी करतात.
 
मोहम्मदच्या नातेवाईकांनी भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या मोहम्मदच्या फोटोला दुजोरा दिला आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी मोहम्मदची आई, गावचं प्रशासन यांच्याशी संपर्क साधला. मोहम्मदच्या सुटकेसाठी औपचारिक पातळीवर कार्यवाही सुरू झालेली नाही.
 
सीमा ओलांडण्याच्या घटना
गेल्या काही दिवसात सीमा पार करून भारतात येण्याची ही पहिलीच घटना नाही.
 
सिंध प्रांताला लागून असलेल्या राजस्थान आणि गुजरातमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सीमारेषेवर तारांचं कुंपण आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये हे कुंपण पार करून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
गेल्या महिन्यात बहावलपूरचा 30 वर्षीय अलाउद्दीन श्रीगंगानगर भागातून सीमा पार केली. चौकशीदरम्यान त्याच्याकडे काहीही संदिग्ध मिळालं नाही. ऑगस्ट 2021 मध्ये सिंधमधल्या थरपारकर जिल्ह्यातल्या एका युवकाने घरच्यांशी भांडून गुजरातमधल्या कच्छ इथे आला.
 
एप्रिल 2021 मध्ये बारमेर भागात आठ वर्षांचा मुलगा चुकून सीमेपल्याड दाखल झाला होता.
 
भारतातून पाकिस्तानात जाण्याचेही प्रकार घडले आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये राजस्थानातल्या बारमेर इथून सीमा पार करून भारताचा एक नागरिक सिंध इथे पोहोचला. तो प्रेयसीच्या घरी शिरण्याचा प्रयत्न करत होता. प्रेयसीच्या घरच्यांनी त्याला पाहिलं आणि पकडलं.
 
जुलै 2020मध्ये उस्मानाबाद इथल्या एका माणसाने थेट कराचीतल्या मुलीला भेटण्यासाठी सीमा पार केली. ते दोघे ऑनलाईन भेटले होते. त्यांचं प्रेम होतं. या प्रेमातच तो तिला भेटायला पाकिस्तानला पोहोचला.
 
गुगलमॅपच्या मदतीने तो बाईकवरून निघाला. हजार किलोमीटर पार केल्यानंतर कच्छ भागात शुकशुकाट असलेल्या ठिकाणी तो बेशुद्ध पडला. काही लोकांना तो बेशुद्धावस्थेत आढळला.
 
एसपी आनंद शर्मा यांनी सांगितलं की, "मोहम्मदने जिथून भारतात प्रवेश केला ते ठिकाण म्हणजे अनुपगढ. तिथे लैला-मजनूची समाधी आहे."
 
लैला-मजनू यांची तिथे खरंच समाधी आहे का कल्पना नाही. पण एक खरं सीमेपलीकडचे आणि अलीकडचे प्रेम पूर्णत्वाला जावं यासाठी याठिकाणी प्रार्थना करत असत.