1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (17:41 IST)

दोन मजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश

ठाणे : भिवंडीत आज (दि. २७) पहाटे दोन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये एका ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे. ही व्यावसायिक इमारत होती. आज पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास भिवंडीमधील खाडीपार भागामध्ये ही घटना घडली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
ग्राउंड प्लस २ म्हणजे तळमजल्यासह वर दोन मजल्याची ही इमारत होती. या इमारतीच्या तळमजल्यात ७ दुकानं होती. वरच्या मजल्यांवर व्यावसायिक आस्थापने होती. इमारत कोसळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले, अशी माहिती निझामपुरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये माजिद अन्सारी या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. इमारत कोसळली त्यावेळी माजिद हा झोपलेला असल्यामुळे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तर ढिगाऱ्या खाली अडकलेल्या एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे. त्याला कुठलीही दुखापत झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या सुत्रांनी सांगितले आहे.
कोसळलेली इमारत ही किती जुनी होती आणि कुठल्या स्थितीमध्ये होती, याची अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही. या प्रकरणी अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor