आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यामुळे काळजी वाढली
देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईमध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. याबाबत दिल्लीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत, तर मुंबईतही अनेक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत.
दरम्यान, बुधवारी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत (DDMA) बैठक घेतली. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या या महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही उपस्थित होते.
दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी भीती व्यक्त केली आहे की मुंबईत कोरोना संसर्गाची दररोजची प्रकरणे 2000 च्या पुढे जाऊ शकतात. ते म्हणाले, "गेल्या आठवड्यात दररोज 150 केसेस येत होत्या. आता सुमारे दोन हजार केसेसची नोंद होत आहे. मुंबई आज दररोज दोन हजार केसेस ओलांडू शकते."
दरम्यान महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यामध्ये टोपे म्हणाले, "अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या आज (29 डिसेंबर) 2000 च्या पुढे येण्याची शक्यता आहे. मुंबईचा पॅाझिटिव्हीटी रेट 4 टक्के येऊ शकतो. हे अजिबात चांगलं नाही. आपल्याला काळजी घ्यावी लागेल. काळजी घेतली नाही तर किंमत चुकवावी लागेल. निर्बंध वाढवण्याची गरज निर्माण होऊ शकेल. मुख्यमंत्री आणि आरोग्यविभाग याबाबत निर्णय घेतील. परिस्थिती पहाता निर्बंधाबाबत आज किंवा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे."