सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (16:15 IST)

मुंबईकरांवर लॉकडाऊन लादायचा नाही; पालकमंत्री अस्लम शेख यांचे वक्तव्य

गेल्या काही महिन्यांपासून मंदावलेल्या कोरोनाने आता पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ नोंदवली गेली आहे. काल मुंबईत एक हजाराच्या वर तर महाराष्ट्रात २ हजार १७२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का? अशी चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी लॉकडाऊनबाबत सूचक विधान केले आहे. राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये आम्हाला पुन्हा लॉकडाऊन पाहायचा नाही आहे, आम्हाला लोकांवर लॉकडाऊन लादायचा नाही आहे, असे अस्लम शेख यांनी म्हटले आहे.
 
मुंबई आणि राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती देताना अस्लम शेख म्हणाले की, मुंबई शहर आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला परत लॉकडाऊन बघायचा नाही आहे. आम्हाला लोकांवर लॉकडाऊन लादायचा नाही आहे. म्हणून आम्ही नियमितपणे परिस्थितीचा आढावा घेत आहोत. बैठका घेत आहोत. तसेच निर्बंध कठोर करत आहोत. कायदे कठोर करतोय. ज्या कार्यक्रमांना याआधी परवानगी दिली होती, अशा कार्यक्रमांमधील उपस्थितीवरही निर्बंध घातले आहेत. त्याबरोबरच राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रित ठेवायची असेल तर जनतेचीही मदत लागेल, असेही अस्लम शेख यांनी सांगितले.