शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (15:39 IST)

'फूट पाडा, हिंसा घडवा'चा अजेंडा

देश भयानक परिस्थितीतून जात आहे. माणसामाणसांत भेद निर्माण केला जात असून लोकांमध्ये फूट पाडली जात आहे. फूट पाडा आणि हिंसा घडवा, हाच एककलमी कार्यक्रम गेल्या सात महिन्यांपासून देशात राबविला जात असून त्या विरोधात तरुणांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन सीपीआय (एम) नेते सीताराम येचुरी यांनी केले.
 
शवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील मुंबई कलेक्टिव्ह' कार्यक्रमाच्या समारोपाच्या भाषणात येचुरी यांनी हे आवाहन केले. सीएए, एनआरसी आणि एनआरपीवरून देशाचे वातावरण तापलेले आहे. सीएएवर बोलले तरी तुम्हाला देशद्रोही ठरवले जात आहे. 
 
तुम्ही पाकिस्तानची भाषा बोलत आहात, असा ठपका मारला जात आहे. एनआरसीवरून महात्मा गांधींच्या नावाने चुकीची माहिती पसरवली जात आहे. दिल्लीच्या शाहीन बागेत दहा हजार लोकांचे आंदोलन सुरू आहे. 
 
या आंदोलनात सर्वस्तरातून लोक आले आहेत. देशातील सर्वच विद्यापीठातील विद्यार्थी रस्त्यावर उतरून लढत आहेत. का? तर देशातील लोकशाही धोक्यात आली असून या लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी तरुण रस्त्यावर उतरले आहेत, असे येचुरी म्हणाले. प्रत्येक धर्माचा एक पवित्र धर्मग्रंथ  असतो. काही धर्माचे दोन पवित्र धर्मग्रंथ आहेत. पण आपल्या भारताचा एकच पवित्र ग्रंथ असून संविधान हाच आपला सर्वोत्तम ग्रंथ आहे, असे त्यांनी सांगितले. मी मागे हैदराबादमध्ये गेलो होतो. तिथे हैदराबादी  बिर्याणी मागितली. मला कांद्याशिवाय बिर्याणी दिली. तेव्हा मी वेटरला त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला बिर्याणीपेक्षा कांदा महाग आहे. सध्या देशाची ही अवस्था आहे. देशात गेल्या 50 वर्षांतील सर्वात मोठी बेरोजगारी निर्माण झाली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. कारखाने बंद होत आहेत. मात्र सरकारला त्याचं काहीही पडलेलं नाही. कालच बजेटमध्ये त्याबद्दल काहीही ठोस देण्यात आलेले नाही. एवढे मोठे लांबलचक भाषण अर्थंमंत्र्यांनी केले. पण पैसा कसा येणार? गुंतवणूक कशी करणार? रोजगार निर्मिती कशी होणार? यावर त्यात अवाक्षरही काढण्यात आलेले नसल्याची टीकाही त्यांनी केली.
 
हिंदूंचा 'ह' आणि मुस्लिमांचा 'म' जेव्हा एकत्र येतो तेव्हा 'हम' तयार होतो. मात्र सध्या देशात या 'हम'वरच हल्ला करण्याचे काम सुरू आहे. 'हम'मध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे, असे सांगतानाच आम्ही कुणालाही भडकावत नाही. आम्ही तरुणांच्या पाठोपाठ जात आहोत. आजचे तरुण हे आधुनिक शिपाई आहेत. भारताचे भविष्य आहेत. देशातील द्वेष आणि फूट पाडण्याच्या राजकारणाला मूठमाती देण्याची  जबाबदारी या तरुणांवर आहे. त्यामुळे अखंड भारतासाठी तरुणांनो, एकत्र या, असे आवाहनही त्यांनी केले.