म्युकरमायकोसिसवर उपचारासाठी अद्ययावत ‘ऑपरेशन थिएटर’सुरू करणार
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अद्ययावत ऑपरेशन थिएटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात तातडीची बैठक घेऊन या रोगाला अटकाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
ज्या कोरोना रुग्णांची रोगप्रतिकारक्षमता कमी आहे किंवा ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास आहे, अशांना म्युकरमायकोसिस हा आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या रुग्णांना डोळे आणि कानाला बुरशी आल्याने त्रास होतो. वेळीच उपचार मिळाले नाहीत तर डोळ्यांवाटे हा संसर्ग मेंदूमध्ये जाऊन रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते. गेल्या काही दिवसांत मुंबई, ठाणे व एमएमआर क्षेत्रात या आजाराचे रुग्ण वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या रुग्णांवर वेळीच उपचार करून त्यांना कसा दिलासा देता येईल, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अद्ययावत ऑपरेशन थिएटर सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी दिले. त्याशिवाय या रुग्णांवर उपचार करण्यासाठी निष्णात ईएनटी सर्जनची आवश्यकता असल्यामुळे ठाण्यातील नामवंत ईएनटी सर्जन डॉ. आशिष भूमकर आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी पालिकेला लागेल ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. त्यांच्याच नेतृत्वाखाली एक विशेष टीम कळवा रुग्णालयात तैनात करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. याशिवाय या रुग्णांना लागणारी औषधे, वैद्यकीय साधने आणि पुढे लागणारी ओपीडीची सुविधा पुरवण्याचे देखील निश्चित करण्याचे करण्यात आले.