शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 (21:35 IST)

मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, अलर्ट जारी

मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दहशतवादी ड्रोन आणि छोट्या विमानांच्या साह्याने मुंबईत दहशतवादी हल्ले करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर मुंबईतील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत रिमोट कंट्रोल विमानातून हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील प्रमुख ठिकाणांसह दहशतवाद्यांनी व्हीव्हीआयपींनाही लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे. मुंबईत सध्या ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, जर कोणी या नियमांचे उल्लंघन केले तर त्याला आयपीसी कलम 188 अंतर्गत शिक्षा केली जाणार आहे.
 
या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. याशिवाय, गुप्तचर यंत्रणाही पूर्णपणे सतर्क झाल्या असून, मुंबईतील अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.
 
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशानुसार, दहशतवादी आणि देशद्रोही ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडरचा वापर करून हल्ला करण्याची शक्यता आहे. तसेच, व्हीव्हीआयपींनाही लक्ष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी हेलिकॉप्टर, हॉट एअर बलूनसह अन्य संशयास्पद गोष्टींच्या वापरावर पुढील 30 दिवस बंदी घालण्यात आली आहे. या काळात फक्त मुंबई पोलीस हवाई पाळत ठेवणार आहेत. हा आदेश 13 नोव्हेंबर ते 12 डिसेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले.