रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीएमसी चुनाव 2022
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (09:48 IST)

उद्धव ठाकरेंना ऋतुजा लटकेंच्या विजयाचा फायदा मुंबई महानगर पालिकेसाठी होईल का?

rutuja uddhav
मयुरेश कोण्णूर
अंधेरी-पूर्व या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल अपेक्षेप्रमाणं आला. ज्यांच्या निधनामुळं ही जागा रिक्त झाली होती ते शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आणि 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके 53 हजार मतांच्या मताधिक्क्यानं निवडून आल्या.
 
म्हटलं तर ही साधी पोटनिवडणूक. केवळ 31.74 टक्के असा मतदानातला आटलेला उत्साह दाखवणारी. पण पती आणि आता आमदार झालेल्या पत्नी, या दोघांच्याही पक्षाची नावं वेगवेगळी आहेत. दोघांची चिन्हंही वेगवेगळी. रमेश लटकेंचं 'धनुष्यबाण' तर ऋतुजा लटकेंची 'मशाल'. याच फरकामध्ये या निवडणुकीचा इतिहास सामावला आहे. त्यामुळेच ही निवडणूक इतरांपेक्षा वेगळी ठरली.
 
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कुठूनही, कसाही मिळालेला विजय हवा होता. तो त्यांना मिळाला.
 
समोर तगडा कोणीही प्रतिस्पर्धी नव्हता. पण त्यानं या निवडणुकीचं गांभीर्य कमी होत नाही, कारण अगोदर उमेदवार देऊन भाजपानं तो शेवटच्या क्षणी मागं घेतला. काहींनी म्हटलं की पराभवाच्या भितीनं घेतला.
 
या निवडणुकीच्या निमित्तानं निकालापर्यंत जे घडलं आणि जे घडलं नाही (म्हणजे शिवसेना-भाजपा अशी सरळ लढत झाली नाही), त्याचा अटळ परिणाम येऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीवर होणार आहे. त्या निवडणुका कधी होणार हे अद्याप कोणालाही माहित नाही. पण या निकालानंतर मुंबईची समीकरणं कशी असतील हे तपासणं आवश्यक आहे.
 
शिवसेनेचं काडर आणि मतदार अजूनही ठाकरेंकडेच आहे का?
शिंदेंच्या बंडापासून जी पडझड झाली त्यानं शिवसेनेचा मुंबईतला जो मूळ शिवसैनिक आहे तो कोणाशी बांधील आहे हा प्रश्न विचारला जातो आहे. शिवसेनेचा जीव हा शाखा आणि त्या शाखांना बांधला गेलेला शिवसैनिक हा आहे. त्यावरच मुंबईतला सत्तेचा डोलारा उभा राहिला आणि शाबूत राहिला.
 
तो शिवसैनिक शिंदेंकडे गेला का, त्याला पण उद्धव ठाकरेंच्या नव्या राजकीय भूमिकेचं वावडं होतं का की तो उद्धव यांच्यासोबतच राहिला अशी शंका होती. ती दसरा मेळाव्याच्या वेळेसही विचारली गेली होती आणि दोन्ही बाजूंनी त्यासाठी शक्तिप्रदर्शन केलं गेलं होतं.
 
पण मेळाव्यानंतर केवळ दावे होते आणि अंधेरीच्या निवडणुकीनंतर स्पष्ट निकाल हाती पडणार होता. त्यानुसार या मतदारसंघात तरी तो सैनिक उद्धव ठाकरेंशी प्रामाणिक राहिला हे स्पष्ट आहे.
 
शिंदे गट ही जागा स्वत: लढवू शकला नाही वा भाजपालाही त्यांची मदत होऊ शकली नाही यावरुन ते दिसलंच. पण या उदाहरणावरुन सगळ्या मुंबईबाबत तोच निष्कर्ष काढता येणार नाही. त्यासाठी महापालिकेसारखं मोठं मैदानच हवं. पण सगळी संघटना फुटली नाही हे मात्र इथं सिद्ध झालं.
 
दुसरा प्रश्न येतो मतदारांचा. अंधेरीत पाहिलं तर रमेश लटकेंना गेल्या वेळेस 57 हजारांच्या आसपास मतं मिळाली होती. ऋतुजा यांची मतं दहा हजारांनी वाढली आहेत. 2019 च्या तुलनेतं मतदानंही कमी झालं होतं. हे लक्षात घेता शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मतांचा टक्का (व्होट शेअर) वाढला.
 
शिवाय अंधेरीसारख्या उपनगरातला मतदार हा मिश्र आहे. तिथे केवळ मराठीच नाही तर बहुभाषिक आणि बहुप्रांतीय मतदार आहे. म्हणजे त्यांचीही मतं शिवसेनेला मिळाली. भाजपा या निवडणुकीत न उतरल्यानं त्यांचाच असलेला मूळ मतदार मतदानाकडे वळला नसणं शक्य आहे आणि परिणामी एकूण मतदान कमी झालं. याचा अर्थ, शिवसेनेचा असलेल्या मतदार हा त्यांच्यापाशी भक्कम राहिला असा काढता येतो.
 
पण यात एक मेख आहे. ऋतुजा लटके या केवळ शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार नव्हत्या तर महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. या मतदारसंघात कॉंग्रेसचीही ताकद आहे. मग लटके यांना पडलेल्या मतांमध्ये मूळ कॉंग्रेसची मतं किती हेही पहायला हवं.
 
ते नक्की समजलं, तर त्यांच्याकडे शिवसेनेची मूळ मतं किती आणि मित्रपक्षाची मतं किती हे स्पष्ट होईल. शिवाय नोटाला मिळालेली 12 हजारांहून अधिक मतं कोणाची हेही तपासावं लागेल. मगच ठाकरेंची शिवसेना आपली सगळी मतं राखू शकली असं नक्की म्हणता येईल.
 
पण कसाही असला तरी या निकालानं शिवसेनेला या स्थितीत नवी ऊर्जा मिळाली. विशेषत: पश्चिम उपनगरातल्या या मतदारसंघात जो बहुभाषिक आहे.
 
मुंबई महापालिकेत या भागात शिवसेनेची कसोटी लागणार आहे. सेनेचा पारंपारिक मराठी मतदार दक्षिण-मध्य मुंबईत आहे. पण इकडे उत्तर भारतीय मतं लक्षणीय आहेत जी गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपाकडे गेली आहेत. त्यामुळेच आजचा निकाल सेनेला या भागात आशा दाखवणारा आहे.
 
उद्धव ठाकरेंचं पॉलिटिकल आणि सोशल इंजिनिअरिंग काम करतंय का?
अगोदर भाजपापासून फारकत झाल्यावर आणि नंतर शिंदेंच्या बंडानं काही जण त्यांच्या बाजूनं गेल्यानं, उद्धव ठाकरेंना त्यांचा जुना मतदारांचा बेस कमी झाला आहे याची जाणीव झाली आहे.
 
त्यात हिंदुत्वाचा मुद्द्यावरुनही परिणाम झाला आहे. त्यामुळे आपला मतदार वाढवण्यासाठी सध्या अनेक प्रकारचं सोशल आणि पोलिटिकल इंजिनिअरिंग ठाकरेंची सेना करते आहे असं दिसतं आहे.
 
केवळ मराठी चेहरा न राहता ती अधिक सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न तर ठाकरेंनी आधीपासूनच सुरू केला होता. त्यात आता गेल्या काही काळापासून मुस्लिम समाजाचे विषय घेऊन तो वर्गही सेनेशी जोडण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
 
दसऱ्याच्या मेळाव्यात बिलकिस बानोचा मुद्दा त्यांनी जाहीर बोलून दाखवला होता. मुस्लिमविरोधामुळे तो वर्ग कधीही सेनेकडे आला नव्हता. तो आता सेनेच्या सभांमध्ये दिसू लागला आहे.
 
अंधेरीत मुस्लीम मतांची संख्याही मोठी आहे. ती मतं शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्याचं म्हटलं जातं आहे. जर तसं झालं असेल तर उद्धव यांचा प्रयोग मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशस्वी ठरतो आहे का हे पाहावं लागेल. महापालिका निवडणुकीत ते निर्णायक ठरू शकेल.
 
सुषमा अंधारेंसारख्या दलित चळवळीतल्या महिलेला सेनेचा नवा चेहरा करुन उद्धव ठाकरे या समूहांनाही सेनेच्या जवळ आणू पाहताहेत.
 
'वंचित बहुजन आघाडी' सोबत त्यांच्या मैत्रीची सुरू असलेली चर्चा त्याचाच एक भाग आहे. त्याचा काही उपयोग या निवडणुकीत झाला का हेही पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे.
 
दुसरीकडे 'महाविकास आघाडी' मध्ये असल्यानं कॉंग्रेसच्या मतांचा सेनेला अंधेरीच्या निवडणुकीत फायदा झाला. हे महापालिका निवडणुकीसाठी अतिशय महत्त्वाचं समीकरण आहे. कॉंग्रेसची ताकद मुंबईत कमी झाली असली तरी ती एक जुनी ताकद आहे.
 
जर सेना-कॉंग्रेस हे समीकरण आणि मतांची ट्रान्सफर हे मुंबई महापालिका निवडणुकीत प्रत्यक्षात आली तर ते या दोन्ही पक्षांसाठी आणि विरोधकांसाठीही निर्णायक ठरू शकतं. त्यादृष्टीनं अंधेरीची निवडणूक ही लिटमस टेस्ट होती. उद्धव यांचं हे पॉलिटिकल इंजिनिअरिंग आता महापालिका निवडणुकीत प्रत्यक्षात कसं उतरणार याकडे पहायला हवं.
 
भाजपा महापालिकेची रणनीती कशी आखणार?
अंधेरीच्या निवडणुकीत न टाळता येणारा खेळाडू भाजपा होता, जरी त्यांनी निवडणूक लढवली नाही तरीही. भाजपानं ती लढवली असती तर गणितं बदलली असती हे नक्की. निकाल बदलला असता किंवा नाही हे सांगता येणार नाही. पण आजच्या निकालानंतर भाजपाच्या मुंबई महापालिकेच्या निवडणूक रणनितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
 
भाजपाला ही निवडणूक लढवायची होती. मुरजी पटेलांनी अधिकृत अर्ज भरलाही होता. पण शेवटच्या क्षणी तो मागे घेण्यात आला. असं विश्लेषण केलं गेलं की शिवसेनेची ताकद, शिंदे गटाला न मिळालेला अपेक्षित प्रतिसाद, लटकेंसाठी असलेली सहानुभूती हे पाहता महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रमाअगोदर सेनेसोबत सरळ लढतीमध्ये पराभव नको, म्हणून भाजपानं घेतलेली ही सूचक माघार होती.
 
अर्थात, भाजपानं हा दावा फेटाळला. पण त्याचा परिणाम नाकारता येणार नाही.
 
महापालिकेतल्या भ्रष्टाचाराचे आरोप असो वा 'मराठी दांडिया' सारखे कार्यक्रम, शिवसेना आणि तिच्या मतदारांबद्दल भाजपा आक्रमक झाली आहे. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्या बोलण्यातही ती आक्रमकता आहे. त्यामुळे या निकालानंतर भाजपाची आक्रमकता अधिक वाढेल.
 
महापालिका निवडणुकीत भाजपाच्या मदार शिंदे गट आणि राज ठाकरेंची 'मनसे' यांच्यावरही असेल कारण शिवसेनेच्या पारंपारिक मतांमध्ये त्यांच्यामुळे विभाजन होईल.
 
पण अंधेरीच्या निवडणुकीत याचा काही फायदा झाला नाही. शिंदे गटाला उमेदवार मिळाला नाही तर राज यांना पत्र लिहून भाजपाला माघार घेण्याविषयी सुचवावे लागले. त्यामुळे या मित्रांसोबत कशी रणनीति असावी याचा विचार अंधेरीनंतर भाजपाला करावा लागेल.
 
या निवडणुकीमध्ये भाग न घेतल्यानं भाजपाची 'झाकली मूठ सव्वा लाखाची'च' राहिली. पण ते त्यांच्या पथ्यावरही पडू शकतं आणि विरोधातही जाऊ शकतं. त्यांची खरी ताकद आता महापालिका निवडणुकीतच समजेल.
 
अंधेरीची पोटनिवडणूक ही मुंबई महापालिकेची रंगीत तालिम होती. त्यामुळं तिचं महत्व आहेच. केवळ रंगमंचावर या तालमीत जे घडलं त्यानं मुख्य प्रयोगाचा अंदाज लावता येणार नाही. त्यासाठी पडद्यामागच्या सगळ्या घटनांची संगती लावावी लागेल.

Published By -Smita Joshi