गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 27 एप्रिल 2021 (21:53 IST)

मुंबईतील रुग्णांची संख्या कमी होण्याला 'ही' 3 कारणं आहेत का?

-प्राजक्ता पोळ
महाराष्ट्रात मार्च 2021 पासून कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढू लागली. राज्यातला कोरोना रूग्णांचा प्रतिदिन आकडा 60 हजारांच्या पुढे गेला. मुंबईमधील रूग्णांचा आकडा हजारांवर पोहचला आणि दिवसेंदिवस तो वाढत गेला.
 
13 एप्रिल 2021 ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लागू केले. त्यावेळी मुंबई परिसरातील दैनंदिन कोरोना रूग्णांची संख्या 16,596 इतकी होती, तर फक्त मुंबई शहरातील दैनंदिन कोरोना रूग्णांची संख्या ही 7,873 होती. हे कडक निर्बंध लागू करून 12 दिवस झाले. यानंतर मुंबईतल्या कोरोना रूग्णांची संख्या ही कमी होताना दिसली.
 
12 दिवसांच्या या रूग्ण संख्येत जवळपास 50 टक्यांपेक्षा अधिक घट झालेली बघायला मिळाली. मुंबईतल्या रूग्ण संख्येत घट होण्याची काय कारणं आहेत?
 
तत्पूर्वी, गेल्या महिन्याभरातील निवडक दिवसांमधील रुग्णवाढीची संख्या पाहूया. 4 एप्रिल रोजी एका दिवसात 11 हजार 163 रुग्ण आढळले होते, तर काल म्हणजे 26 एप्रिल रोजी एका दिवसात वाढलेल्या रुग्णांची संख्या 3 हजार 840 वर आली.
 
गेल्या महिन्याभरात मुंबईत एका दिवसात आढळलेल्या रुग्णांची संख्या :
 
4 एप्रिल 11,163
7 एप्रिल 10,428
9 एप्रिल 9,200
11 एप्रिल 9,000
13 एप्रिल 7,898
19 एप्रिल 7,381
23 एप्रिल 7,221
25 एप्रिल 5,542
26 एप्रिल 3,840
मुंबईतील रुग्णवाढ कमी करण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या किंवा शासन-प्रशासनानं कोणत्या गोष्टी केल्या, हे पाहूया.
 
1) कडक निर्बंध?
राज्यातला लॉकडाऊन हा 13 एप्रिलपासून लावण्यात आला. पण मुंबई महापालिका क्षेत्रात फेब्रुवारी महिन्यापासून निर्बंध लावायला सुरुवात केली होती. जेव्हा मुंबई शहरातला कोरोना रूग्णांचा दैनंदिन आकडा 750 च्या घरात होता. तेव्हा 18 फेब्रुवारीला मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मुंबईसाठी काही निर्बंध जाहीर केले.
 
विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर मार्शलद्वारे कारवाई
लग्न समारंभ, क्लबस्, उपहारगृह याठिकाणी धाडी टाकून नियमांचं उल्लंघन होत असल्यासं कारवाई करणे.
ब्राझिलमध्ये त्या काळात वाढता रूग्णांचा आकडा बघता तिथून येणार्‍या प्रवाश्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवणे.
पाचपेक्षा अधिक रूग्ण असलेल्या इमारती सील करणे.
हे सर्व निर्बंध हळूहळू कडक होत गेले.
 
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सांगतात, "लॉकडाऊन आधी महापालिकेने निर्बंध लागू करायला सुरवात केली. आठवडी बाजार बंद केले होते. 50 पेक्षा अधिक व्यक्ती एका ठीकाणी आढळल्या तर त्यांच्यावर महापालिकेने मोठ्या प्रमाणात कारवाई केली. पण मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर त्याचा अधिक फायदा झाला. लोकल ट्रेनमध्ये, बसमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना परवानगी दिली. त्यामुळे प्रसार कमी होण्यास मदत झाली. कोरोनाचा धोका टळलेला नाही पण प्रसार कमी होतोय हे शहरासाठी चांगलंच आहे."
 
2) लसीकरण
राज्यातलं सर्वाधिक लसीकरण मुंबई महापालिका क्षेत्रात झाल्याचं आकडेवरून स्पष्ट झालं आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 22 लाख 82 हजार 609 इतक्या लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
 
25 एप्रिल या एका दिवसांत 69,577 इतकं लसीकरण करण्यात आलं.
मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल सांगतात, "मुंबई महापालिकेचं सर्व तांत्रिक अडचणी दूर करून दिवसांला 1 लाख नागरिकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य आहे. ते लवकरच आम्ही पूर्ण करू. काही दिवसांपूर्वी लसीचा तुटवडा होता पण 25 एप्रिलला कोव्हीशील्डचा दीड लाख लसीचा साठा उपलब्ध झाला आहे. 'कोवॅक्सीन' ही लस मर्यादीत केंद्रांवर उपलब्ध आहे".
 
3) रूग्णांच्या संख्येइतक्या सुविधा?
मुंबई महापालिका क्षेत्रात रूग्णांची 17 हजारांपर्यंत पोहचली. मार्चच्या शेवटच्या आठवड्याच्या आकडेवारीनुसार 78 हॉस्पिटलमधले 12906 बेड महापालिकेच्या ताब्यात होते. त्यापैकी 3072 उपलब्ध होते. जशीजशी रूग्ण संख्या वाढत गेली. तसे खासगी हॉस्पिटलमधले बेड महापालिकेने ताब्यात घेण्यात आले.
 
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 97 हॉस्पिटलमधले 15971 बेडस् महापालिकेने ताब्यात घेतले. त्या काळात मुंबई शहरातील कोरोना रूग्णांची संख्या 8 हजारांच्या घरात पोहचली होती. एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यात 161 हॉस्पिटलमधले 21169 बेड महापालिकेच्या ताब्यात होते.
 
रूग्णसंख्या वाढल्यानंतर बेड मिळण्यासाठी रूग्णांना अडचणी आल्या, पण आम्ही त्या सोडवण्याचा पूरेपूर प्रयत्न केल्याचं महापौर किशोरी पेडणेकर सांगतात.
 
मुंबईला दररोज 235 मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज आहे. राज्यात 1500 मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादन आहे. त्यापैकी 1250 मेट्रीक टन ऑक्सिजनची संपूर्ण महाराष्ट्राला लागतो आहे. मुंबई महापालिकेने एका खासगी कंपनीची करार करून रोजची 50 मेट्रीक टन ऑक्सिजनची अडचण सोडवली आहे.
 
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दररोज औषधसाठा, इंजेक्शनस्, उपलब्ध बेड, ऑक्सिजन याचा आढावा घेतला जातो.
 
आरोग्य विभागातून मिळालेल्या माहितीनुसार "17 एप्रिलला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) सुरेश काकाणी रोजचा आढावा घेताना लक्षात आले की, महापालिकेच्या काही हॉस्पिटलमध्ये पुरवठादारांकडून त्या दिवशीचा ऑक्सिजन पुरवठा झाला नाही. तेव्हा ऑक्सिजन टॅंकरच्या लोकेशनची त्यांनी माहिती घेतली. ते पोहचायला उशीर लागणार आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी संबंधित हॉस्पिटलमध्ये संपर्क साधून रूग्णांना इतर हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री त्यांनी 168 रूग्णांना पालिकेच्या विविध हॉस्पिटलमध्ये हलवलं. जर हे वेळीच केलं नसतं तर रूग्णांच्या जीवावर बेतू शकलं असतं".
 
सुविधांची कमतरता भासत असली तरी त्या पुरवण्याचा प्रयत्न असल्याचं महापालिकेतील आरोग्य विभातील कर्मचारी सांगतात.
 
दरम्यान, मुंबईतील स्थितीबाबत महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या कोव्हिड टास्क फोर्सच्या सदस्य डॉक्टरांशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र, अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर इथे अपडेट करण्यात येईल.