1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 22 जानेवारी 2022 (16:45 IST)

Tardeo Fire: केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची भरपाई

मुंबईत ताडदेव भागातल्या कमला बिल्डिंग या 20 मजली इमारतीला सकाळी आग लागली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. नाना चौकातील गांधी रुग्णालयासमोर कमला बिल्डिंगमध्ये ही आग लागली आहे. धुराचे लोट या इमारतीतून बाहेर पडत आहेत. धुरामुळे लोकांना श्वास घ्यायला त्रास होत आहे.
 
या दुर्घटनेतील मृत व्यक्ती आणि जखमींच्या मदतीसाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून पंतप्रधान कार्यालयाने या दुर्घटनेनंतर काही तासांतच मृत आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर केली. त्यानुसार या दुर्घटनेतील मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
 
तर राज्य सरकारकडूनही दुर्घटनेतील मृतांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर दुर्घटनेतील जखमींवर महापालिका रुग्णालयात मोफत उपचार केले जातील, अशी माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली. 
 
ताडदेवच्या नाना चौक गवालिया टँक येथील 20 मजली कमला इमारतीत शनिवारी सकाळी भीषण आग लागली होती. दुपारच्या सुमारास ही आग पूर्णपणे नियंत्रणात आली. या दुर्घटनेत सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर तब्बल 15 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर महापौर किशोरी पेडणेकर आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.