गुरूवार, 7 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जून 2020 (09:00 IST)

हत्येनंतर मृतदेह गायब, मृतदेहाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह

मुंबईतील गोवंडी परिसरात कोरोनाबाधित रुग्णाची  हत्या करण्यात आली होती. या  हत्येच्या पाच दिवसांनी या रुग्णाचा मृतदेह राजावाडी रुग्णालयातून गायब झाला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या प्रकरणात  शिवाजी नगर येथे राहणाऱ्या या व्यक्तीवर 3 जून रोजी चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर या व्यक्तीला तात्काळ घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ज्यावेळी या व्यक्तीला जखमी अवस्थेत रुग्णालयात आणलं, तेव्हा तो जिवंत होता. मात्र, काहीच वेळात वेळात त्याचा मृत्यू झाला.या व्यक्तीची जोपर्यंत कोरोनाची टेस्ट होत नाही, तोपर्यंत त्याचं शवविच्छेदन करण्यात येणार नाही, अशी भूमिका राजावाडी रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाच्या डॉक्टरांनी घेतली. त्यामुळे 3 जून रोजी मृत व्यक्तीचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. तोपर्यंत मृतदेह रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला.
 
सोमवारी त्या व्यक्तीचा कोरोनाचा अहवाल आला. तो कोरोना पॉझिटिव्ह होता. त्यामुळे या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रुग्णालयाचे कर्मचारी मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेले. तेव्हा, या व्यक्तीचा मृतदेह गायब असल्याचं कळालं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून मृतदेहाचा शोध सुरु आहे. ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याने चिंता वाढली आहे.