शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 20 जून 2021 (18:35 IST)

कोरोना लस: मुंबईत उद्यापासून तीन दिवसांसाठी होणार मोफत 'वॉक इन' लसीकरण

21 जूनपासून (सोमवार- उद्यापासून) देशात 18-44 वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यासाठी मुंबईत लसीकरणाचे नियोजन वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं आहे.
 
फेरीवाले, रिक्षाचालक यांना लसीकरणात प्राधान्य देण्याचा विचार करण्यात येत आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली.
 
आठवड्यातील तीन दिवस 100 टक्के वॉक-इन लसीकरण असणार आहे. लसीकरण जलद गतीने व्हावे यासाठी सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तिन्ही दिवशी मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर वॉक इन लस दिली जाणार आहे.
 
मुंबई बाजारपेठा आणि सार्वजनिक वाहतूकीदरम्यान सर्वाधिक गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे फेरीवाले, रिक्षाचालक, बेस्ट बसचे ड्रायव्हर आणि इतर कर्मचारी वर्ग अशांना लसीकरणात प्राधान्य दिलं जाऊ शकतं.
उद्यापासून होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी केंद्र सरकारकडून मुंबई महानगरपालिकेला 8 लाख 70 हजारांहून अधिक लसीकरणाचे डोस मिळण्याची अपेक्षा आहे.
 
गेल्या महिन्यात पालिकेला 4 लास लसीचे डोस आणि त्यापूर्वी 8 लाख 70 हजार लसीचे डोस मिळाले होते.
 
18 ते 44 वयोगटातही विविध टप्पे केले जाऊ शकतात का याची चाचपणी पालिकेकडून केली जात आहे. लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये आणि वेगाने लसीकरण व्हावे यासाठी 18 - 30 किंवा 30-44 अशा दोन टप्प्यात लसीकरण होऊ शकते का याचा विचार सुरू आहे.

यासंदर्भात बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं, "देशात तरुणांचं मोफत लसीकरण सुरू होत आहे. सर्वांत मोठ्या लोकसंख्येच्या लसीकरणासाठी महानगरपालिका तयारी करत आहे. घरोघरी जाऊन लसीकरणाबद्दल बोललं जात होतं. पण आम्ही घराजवळील आरोग्य शिबिरातच लसीकरण करण्याविषयी बोललो."
 
प्रत्येक वॉर्डात लसीकरणासाठी एक केंद्र असणार आहे असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. ज्या सोसायट्यांना लसीकरण शिबिर राबवायचे आहे त्यांनी महापालिकेशी समन्वय करावा असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
 
मुंबई लोकल कधी सुरू होणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्या म्हणाल्या, "मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी सांगितल्याने तातडीने लोकल सुरू करण्याचा विचार नाही." त्यामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई रेल्वेसाठी प्रवाशांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.