मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (07:49 IST)

१ मार्चपासून मुंबईतील लोकप्रतिनिधीना कोरोना लस देणार

येत्या १ मार्चपासून मुंबईतील लोकप्रतिनिधी यांनाही कोरोनाला रोखण्यासाठी लस देण्यात येणार आहे. मी स्वतः पालिका आरोग्य यंत्रणेकडे नाव नोंदवले असून कागदपत्रांची पूर्तता केली आहे. मी सुद्धा कोरोनावरील लस घेणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
 
कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, महापौर किशोरी पेडणेकर विविध रुग्णालयांना भेटी देत असून मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात करण्यात येणाऱ्या पूर्वतयारी कामांचा महापौरांनी उप महापौर ॲड. सुहास वाडकर यांच्यासह पाहणी करून संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली.
 
शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी, महापौर किशोरी पेडणेकर यांना, एक पत्र पाठवून समाजात कार्यरत लोकप्रतिनिधींनाही कोरोनावरील लस देण्याची मागणी केली होती. वास्तविक, केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाने कोरोनावरील लस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोनाशी संबंधीत आरोग्य कर्मचारी, त्यानंतर काम करणारे फ्रंट लाईन वर्कर्स आदींना लस देण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. तसेच, दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेलाही सुरुवात करण्यात आली आहे.