सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 16 डिसेंबर 2020 (18:00 IST)

राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अटट्हास का आहे? फडणवीस यांचा सवाल

कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायने दिले आहेत.  न्यायालयाच्या दणक्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत करू नये. मुंबईच्या विकासासाठी काम हे केलं पाहिजे. मेट्रोच्या कामासाठी लाणारा पैसा हा जनतेचा, सर्वांचाच आहे. कारशेडचं काम त्वरित सुरू न केल्यास प्रकल्प २०२४ पर्यंत लांबेल. राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अटट्हास का आहे?,” असा सवालही फडणवीस यांनी केला.
 
“मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं काम केलं जात आहे. सरकार या कामात जेवढा उशीर करेल तितकी त्या प्रकल्पाची किंमत वाढत जाणार आहे. उशीर झाला तर दिवसाला सर्व मिळून पाच कोटी रूपयांचं नुकसान होतं. गेलं वर्षभर हे काम रखडलं आहे. त्यामुळे आतापर्यंत किती नुकसान झालंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आरेमध्ये तात्काळ कारशेडचं काम सुरू करण्यात यावं,” असंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. “आदित्य ठाकरे हे नवे आहेत. युवा आहेत. ते पहिल्यांदाच मंत्रिपदावर आहेत. त्यांनी जनतेसाठी काम करावं. त्यांनी अहवाल वाचून काम करावं. यापूर्वी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल त्यांनी वाचावा,” असंही फडणवीस म्हणाले.