प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांना अटक
डिसी डिझाइन या कारचे संस्थापक आणि प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक डीसी स्पोर्ट कार जप्त करण्यात आली आहे. फसवणूक आणि खोटे दस्तऐवज प्रकरणी ही अटक करण्यात आली असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली आहे.
देशातील स्पोर्ट कार बाबत हा पहिला फसवणुकीचा गुन्हा असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. डीसी अवंतिका कारचे रजिस्ट्रेशन खोटं असून एकाच क्रमांकाच्या दोन डिसी अवंतिका कार आहेत. याचे रजिस्ट्रेशन चेन्नई आणि हरियाणा येथे करण्यात आले असून खोट्या दस्तावेज वापरून हे रजिस्ट्रेशन करण्यात आले असल्याचे तपासात समोर आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त भारंबे यांनी दिली आहे. एकाच क्रमांकाच्या दोन कार आम्हाला मुंबईत आढळून आलेल्या होत्या. आम्ही माहिती काढली असता या कार चेन्नई आणि हरियाणा राज्यात रजिस्टर असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अधिक माहिती मिळवली असता त्यातील कारचे रजिस्ट्रेशन खोट्या दस्तावेज तयार करून देण्यात आले होते, अशी माहिती भारंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मुंबईत आढळून आलेल्या डिसी डिझाइन कार ही नरिमन पॉईंट ओबोरॉय हॉटेल या ठिकाणी असल्याची माहिती गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाचे प्रभारी अधिकारी सचिन वाझे यांना मिळाली. वाझे यांच्या पथकाने सापळा लावला. मात्र, ही तेथून निघून गेली होती. दरम्यान हीच कार गेटवे ऑफ इंडिया हॉटेल ताज येथे येत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून डिसी डिझाइन ही स्पोर्ट कार ताब्यात घेतली.