मुंबई परिसरात मुसळधार पाऊसाचा अंदाज  
					
										
                                       
                  
                  				  येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी १२० मिमीपेक्षाही जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय, कोकणातही सर्वत्र पुढील २४ तास पाऊस सुरुच राहील, असेही कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. 
				  													
						
																							
									  
	 
	गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे आणि कोकण परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईची वर्षभराची पाण्याची चिंता मिटत असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावक्षेत्रात समाधानकारक पाऊस कोसळत असल्याने या तलावांमध्ये ९० टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. तसेच तुलसी, विहार, मोडकसागर आणि तानसा ही धरणे भरली असून सर्वात मोठा पाणी साठवण क्षमता असलेले भातसा धरणही ९० टक्के भरला आहे.