मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (08:45 IST)

मुंबईत १९९३ च्या दंगलीत बाळासाहेब ठाकरे यांनी असा बोटचेपेपणा केला असता तर…”, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

मुंबई भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमरावतीतील हिंसाचारावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. राज्यातील ठाकरे सरकार अमरावतीसह नांदेड, मालेगावमधील हिंसाचारावर काहीही बोलत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी असा बोटचेपेपणा केला असता तर १९९३ च्या दंगलीत मुंबईतील हिंदू जीवंत राहिला नसता, असंही मत व्यक्त केलं.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमरावतीतील हिंसाचारावर बोलताना ती ‘हिंदू मार नही खायेगा’ अशी अमरावतीतील स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचं वक्तव्य केलंय. तसेच खऱ्याला खरं म्हणायला आम्हाला कधीच भिती वाटत नाही, असंही ते म्हणाले. त्यांनी अमरावतीत रस्त्यावर उतरलेल्या १५-२० हजार जनसमुहावरही आक्षेप नोंदवला. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “१३ नोव्हेंबरची अमरावतीतील घटना ‘हिंदू मार नही खायेगा’ अशी एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती. तुम्ही म्हणाल मी चिथावणी देतोय, पण खऱ्याला खरं म्हणायला आम्हाला भिती कधीच वाटत नाही. आम्ही जसे संघाचे कार्यकर्ते आहोत, तसे बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करणारे आहोत. त्यांनी आम्हाला हे चालणार नाही हेच शिकवलं. बाळासाहेब ठाकरे यांनी असा बोटचेपेपणा केला असता तर १९९३ च्या दंगलीत

मुंबईतील हिंदू जीवंत राहिला नसता.”
“बाळासाहेबांनी हिंदूंना संरक्षण दिलं नसतं तर मुंबईत हिंदू शिल्लक राहिला नसता”
“महाराष्ट्र भाजपाचा अध्यक्ष म्हणून मी हे जाहीरपणे मान्य करेल की बाळासाहेब ठाकरे यांनी ९३ च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना संरक्षण दिलं नसतं तर मुंबईत हिंदू शिल्लक राहिला नसता. त्या शिवसेनेचे वारसदार अमरावती, नांदेड, मालेगावमधील हिंसाचारावर काही बोलणार नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.
“१२ नोव्हेंबरच्या हिंसाचारात संजय राऊत यांचा हात आहे का?”
चंद्रकांत पाटील म्हणाले, “त्रिपुरात घटना घडली की नाही माहिती नाही त्याची प्रतिक्रिया अमरावती, मालेगावमध्ये येते. प्रतिक्रिया म्हणून धरणे, उपोषण, निदर्शनं, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं हे मी समजू शकतो. पण १५-२० हजाराच्या संख्येने रस्त्यावर उतरायचं का? माजी मंत्री जगदीश गुप्तांसह सगळ्यांची कार्यालयं, दुकानं तोडायची याचा काय संबंध आहे. त्यात कुणाचा हात आहे? जर १३ नोव्हेंबरच्या हिंसाचारात भाजपाचा हात असेल तर मग १२ नोव्हेंबरच्या हिंसाचारात संजय राऊत यांचा हात आहे का?”
“तेव्हा आदिवासींना भडकावणं सोपं होतं, आता…”

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी महाराष्ट्र पोलिसांचं खूप अभिनंदन करेल. माझा ऊर अभिमानाने भरून आलाय. नक्षलवाद नावाची कीड समाजातून समूळ उखडून फेकली पाहिजे. ज्या काळात विकास नव्हता तेव्हा आदिवासींना भडकावणं सोपं होतं. आता सगळा विकास सुरू झाला. सरकारी कर्मचाऱ्यांना वठणीवर आणलं गेलंय. अशा परिस्थितीत केवळ आणि केवळ आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी, खंडण्या वसूल करण्यासाठी सर्वस्व उठवणं बरोबर नाही.”
“नक्षलवाद्यांनी शरण आलं पाहिजे. त्यांनी सामान्य जीवन जगलं पाहिजे, अशीच राज्य किंवा केंद्र सरकारची भूमिका असते. त्यामुळे त्यांना जशास तसं उत्तर दिलं त्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन करतो. मला त्यांचा खूप अभिमान आहे,” असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.