शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 2 एप्रिल 2023 (19:33 IST)

कोकिला बेन यांनी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे आर्ट हाऊस लॉन्च केले, अंबानी कुटुंबाच्या चार पिढ्या एकत्र दिसल्या

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या आई कोकिलाबेन यांनी रविवारी नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात 16,000 चौरस फूट पसरलेल्या आर्ट हाऊसचे उद्घाटन केले. कल्चरल सेंटरच्या मेगा लॉन्चचा आज तिसरा दिवस होता. लाँचिंग इव्हेंटमध्ये अंबानी कुटुंबातील चार पिढ्या एकत्र दिसल्या.
 
मेगा लाँचच्या तिसर्‍या आणि शेवटच्या दिवशी, नीता अंबानी आणि ईशा अंबानी यांनी आंतरराष्ट्रीय फॅशन जगतात भारतीय फॅशनचा प्रभाव दाखवणारे 'इंडिया इन फॅशन' या अनोख्या पुस्तकाचे प्रकाशन केले.
 
ईशा अंबानीने पुस्तकातील काही महत्त्वाचे भाग प्रेक्षकांसाठी वाचून दाखवले. गायक प्रतीक कुऱ्हाड याने आपल्या सुरेल आवाजाने प्रकाशन सोहळ्यात उपस्थित कलाप्रेमींची मने जिंकली.
आर्ट हाऊस येथे 'संगम' या उद्घाटन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्याची रचना भारतातील प्रसिद्ध सांस्कृतिक सिद्धांतकार रणजीत होस्कोटे आणि न्यूयॉर्क स्थित कला संग्राहक आणि गॅलरीस्ट जेफ्री डिच यांनी केली आहे. प्रदर्शनात देशातील आणि जगातील 10 प्रसिद्ध कलाकारांच्या 50 हून अधिक कलाकृतींचा समावेश करण्यात आला आहे.
 
फ्रान्सिस्को क्लेमेंटे, अँसेल्म किफर आणि सेसिली ब्राउन या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांच्या कलाकृती भारतात प्रथमच प्रदर्शित झाल्या आहेत. भूपेन खाखर, शांतीबाई, रंजनी शेट्टर आणि रतीश टी या भारतीय कलाकारांची कामेही येथे पाहता येतील.
 
आर्ट हाऊसच्या डिझाईनचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रदर्शनाच्या गरजेनुसार जुळवून घेता येते. हे चार मजली आर्ट हाऊस बांधण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यात आला आहे.
 
जागतिक दर्जाच्या कला प्रदर्शनांपासून ते तंत्रज्ञान किंवा शिक्षणापर्यंतच्या कार्यशाळा आणि कार्यक्रमही येथे आयोजित केले जाऊ शकतात. नवीन कलागुणांना पुढे आणण्यासाठी आणि कलेला चालना देण्यासाठी आर्ट हाउस महत्त्वाची भूमिका बजावेल. जागतिक व्यासपीठ मिळाल्याने भारतातील युवा कलाकारांच्या प्रतिभेला जगात नवी ओळख मिळेल.