शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जुलै 2022 (21:21 IST)

रविवारी मुंबई उपनगर विभागांवर रेल्वेचा मेगाब्लॉक

Megablock on Central and Harbor railway Sunday
रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामामुळे मुंबई उपनगर विभागांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तसेच लोकलची संख्याही काही प्रमाणात कमी असणार आहे.
 
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल. सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वा. या वेळेत मेगाब्लॉक असेल.
 
या ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच, शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथे थांबून मुलुंडहून धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल फेऱ्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावतील.
 
ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावरील लोकल फेऱ्या मुलुंड आणि माटुंगा या स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. त्यानंतर माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल फेऱ्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावतील.
 
हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल ते वाशी मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.
 
या ब्लॉकच्या कालावधीत पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. शिवाय, सीएसएमटी येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
 
पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहतील. तसेच, ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल येथे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या बंद राहतील.
 
या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल धावतील. तसेच, ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. शिवाय, ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन सेवा उपलब्ध असतील.