राज यांची पदाधिकाऱ्यांना सुचना मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका अशी सूचना पदाधिकाऱ्यांना केली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. रंगशारदा येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला राज ठाकरे मार्गदर्शन करणार होते. मात्र राज ठाकरे १० मिनिटांतच बैठकीतून निघून गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान राज ठाकरे यांची तब्येत ठीक नसल्याने ते बैठकीतून निघून गेल्याचं सांगण्यात येत आहे.
मनसेतर्फ ९ फेब्रुवारीला सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ मोर्चाची दिशा ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शॅडो कॅबिनेट, सीएए मुद्द्यांवर चर्चा होणार होती. राज ठाकरे बैठकीसाठी हजर राहिले होते. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आपल्याला हिंदूह्रदयसम्राट संबोधू नका अशा सूचना केल्या. पण १० मिनिटांतच राज ठाकरे बैठकीतून निघून गेले. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, थ्रोट इन्फेक्शन झालं असल्याने तसंच डॉक्टरांकडे जायचं असल्याने राज ठाकरे लवकर बैठकीतून निघून गेले.