सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (16:08 IST)

परदेशी लस पुरवठादार कंपन्यांची मुंबई पालिकेला पसंती

कोरोना लसीसाठी परदेशी लस पुरवठादार कंपन्यांनी पंजाब, दिल्ली राज्यांना लसीचा पुरवठा करण्यास नकार देत मुंबई पालिकेला मात्र लसींचा साठा देण्यास पसंती दर्शवली आहे. स्पुटनिक आणि अॅस्ट्राझेनेका-फायझर या लसींचा पुरवठा मुंबईस करण्यास ८ पुरवठादार तयार झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मुंबईतील लसीकरण मोहिमेतील अडचण दूर होणार आहे. दरम्यान नव्याने स्वारस्यपत्र सादर केलेल्या काही कंपन्यांना काही महत्त्वाची कागदपत्रे मुंबई पालिकेला सुपूर्त करावी लागणार आहेत त्यामुळे पालिकेनेही निविदेला १ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
 
मुंबईत लसीकरण मोहिम जलद होण्यासाठी मुंबई पालिकेने १ कोटी कोरोनाविरोधी लसींच्या डोससाठी जागतिक लस पुरवठादारांकडून स्वारस्यपत्र मागविले होते. यात १८ मेपर्यंत ५ लस पुरवठा कंपन्यांनी मुंबईला लस देण्यासाठी स्वारस्यपत्र दाखल केले. मात्र कागद पत्रांची पूर्तता करण्यासाठी पालिकेने निविदेला आठवड्याभराची मुदतवाढ दिली. ही मुदत वाढ संपत नाही तोपर्यंत आणखी ३ लस पुरवठादार कंपन्यांनी स्वारस्य दर्शवले, मात्र या पुरवठादार कंपन्यांचेही काही कागद पत्रांची पूर्तता करणे बाकी असल्याने या प्रक्रियेला आणखी ८ दिवसांची मुदतवाढ दिली असल्याची माहिती मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.
 
पालिकेने सोमवारी आणखी एका इच्छुक लस पुरवठादार कंपनीशी संवाद साधला. त्याचदरम्यान मंगळवारी आणखी चार इच्छुक लस पुरवठादारांशी चर्चा करण्यात आली. या निविदा प्रक्रियेस एका आठवड्याची मुदत वाढ देण्यात आली आहे. या कालावधीत पालिका लस पुरवठदार कंपन्यांच्या कागदपत्रांसह नव्या पुरवठादारांना प्रस्ताव सादर करता येईल. सर्व पुरवठादारांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पालिकेने वाटाघाटी सुरु करेल.