बुधवार, 8 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (12:01 IST)

Mumbai :बुरखा घालण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून केला

murder
बुरखा आणि हिजाब संदर्भात अनेक देशांमध्ये वाढता गदारोळ असतानाच मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इकबाल महमूद शेख नावाच्या व्यक्तीने पत्नी रुपालीचा गळा चिरून खून केला कारण ती मुस्लिम प्रथा पाळत नाही आणि बुरखा घातला नाही. रुपालीने इकबालसोबत आंतरधर्मीय विवाह केला होता, मात्र ती इकबालच्या बळजबरीला कंटाळून घटस्फोटाची मागणी करत होती. घटस्फोटापूर्वीच आरोपीने तिची निर्घृण हत्या केली. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आरोपी इकबाल शेख याने पत्नी रुपाली हिला चाकूने गळ्यावर वार करून निर्घृण खून केला. मुंबईतील चेंबूर परिसरात ही घटना घडली आहे. आरोपी इक्बालला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
 
रुपालीचा विवाह तीन वर्षांपूर्वी इकबाल शेख या मुस्लिम तरुणाशी झाला होता. त्यानंतर दोघेही चेंबूर परिसरात असलेल्या इकबालच्या घरी राहत होते. रुपाली हिंदू असल्याने आणि लग्नानंतरही ती मुस्लिम रितीरिवाज पाळत नसल्याने स्वत: इक्बाल आणि त्याचे कुटुंबीय तिच्यावर नाराज होते. इकबालचे कुटुंब रुपालीवर बुरखा घालण्यासाठी दबाव आणत होते, पण ती मान्य करत नव्हती. यावरून वाद झाला. यानंतर रुपाली आणि इकबाल वेगळे राहू लागले. या जोडप्याला एक मुलगाही आहे. 
 
सहा महिने वेगळे असूनही दोघे फोनवर बोलायचे. मात्र, यावेळीही इकबाल तिच्यावर मुस्लिम परंपरा पाळण्यासाठी दबाव आणत असे. रुपाली ही इकबालची दुसरी पत्नी होती. पहिल्या पत्नीला मूलबाळ नसल्याने त्याने तिला घटस्फोट दिला. 
 
आरोपी इकबाल शेख याने रुपालीला सोमवारी सायंकाळी चेंबूर परिसरातील पीएल लोखंडे मार्गावरील नागेवाडी येथे भेटण्यासाठी बोलावले. यादरम्यान बुरखा आणि इतर गोष्टींवरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावर रुपालीने घटस्फोटाच्या मागणीचा पुनरुच्चार केला. हाणामारी आणि वाद वाढत गेल्याने इकबालने खिशातून चाकू काढून रुपालीच्या गळ्यावर वार करून पळ काढला. रुपालीचा जागीच मृत्यू झाला. उपस्थितांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह रुग्णालयात पाठवला. या प्रकरणात आरोपी इकबालला अटक करण्यात आली असून आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.