मुंबई : खड्डे बुजविले जाण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वाट बघावी लागणार
खड्डे बुजविले जाण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वाट बघावी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याची योजना तयार केली आहे. ४० टक्के रस्त्यांवर खड्डे असल्याची बाबही या निमित्ताने समोर आली आहे. विभागाचे सचिव सतीश साळुंखे यांनी सांगितले की, ऑक्टोबरपासून सुरुवात करून नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्गावरील खड्डे पूर्णपणे भरले जातील.
गेल्या आठवड्यात पार पडलेल्या अभियंता दिनाच्या कार्यक्रमात बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या साम्राजावरून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आपली चूक होत असल्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडत आहेत, अशा शब्दात चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभगातील अभियंत्यांचे कान उपटले होते.
या पार्श्वभूमीवर साळुंखे यांनी विभागाच्या वार्षिक देखभाल दुरूस्तीच्या निधीतून खड्डे भरण्यात येणार असल्याची माहिती दिली. राज्यात महामार्ग आणि जिल्हा महामार्ग मिळून जवळपास ९८ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर सध्या ३५ ते ४० टक्के खड्डे आहेत.